Join us  

‘गुड्डू रंगीला’चा रंग फिका

By admin | Published: July 07, 2015 1:36 AM

सुभाष कपूर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘गुड्डू रंगीला’ने पहिल्या तीन दिवसांत काही खास व्यवसाय केला नाही. पहिल्या दिवशी त्याची परिस्थिती नाजूक होती

सुभाष कपूर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘गुड्डू रंगीला’ने पहिल्या तीन दिवसांत काही खास व्यवसाय केला नाही. पहिल्या दिवशी त्याची परिस्थिती नाजूक होती. ओपनिंग कलेक्शन केवळ १.५ कोटींचे झाले. शनिवार आणि रविवारी मात्र व्यवसाय बरा झाला त्यामुळेच पाच कोटींचा व्यवसाय त्याच्या नावावर जमा झाला. तरीही हा व्यवसाय या चित्रपटाला वाचवू शकेल एवढा नाही. पहिल्या तीन दिवसांतील व्यवसायावरच जाणकार मंडळी या चित्रपटाला अपयशी चित्रपटांच्या यादीत टाकत आहेत. या मंडळीनुसार पहिल्या तीन दिवसांत उत्तर भारतात त्याला प्रतिसाद मिळाला असला तरी बहुतेक मल्टिप्लेक्सेसमध्ये त्याची अवस्था फार काही चांगली नव्हती. यापेक्षाही वाईट बाब ही की सोमवारी त्याच्या व्यवसायात घट झाली. जवळपास १५ कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट सोमवारच्या व्यवसायानंतर आपली गुंतवणूकही वसूल करू शकेल अशी परिस्थिती नाही. हा चित्रपट अपयशी ठरण्यासाठी जाणकार मंडळी त्याच्या प्रमोशनला जबाबदार धरत आहेत. ‘गुड्डू रंगीला’ हा विनोदी चित्रपट आहे असा त्याचा प्रचार झाला. प्रत्यक्षात चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत गंभीर आहे.मागे प्रदर्शित झालेल्या चित्रपटांबद्दल बोलायचे म्हटले तर पत्रकारितेतून दिग्दर्शनाकडे वळलेले चॅनेलचे पत्रकार विनोद कापरी यांच्यासाठी चित्रपट बनविण्याचा अनुभव फार काही सुखद ठरला नाही. पश्चिम उत्तर प्रदेश व हरियाणातील खाप पंचायतींच्या कारभारावर लक्ष केंद्रित केलेल्या त्यांच्या ‘मिस टनकपूर हाजिर हो’ला महानगरांतील प्रेक्षकांनी निकालीच काढून टाकले. पहिल्याच वीकेंडला हा चित्रपट वाईट पद्धतीने लटपटला व मोठ्या कष्टाने त्याने १ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पर्यायाने तो बॉक्स आॅफिसच्या स्पर्धेतून बाहेर फेकला गेला.बॉक्स आॅफिसवर सध्या ज्या चित्रपटाची जादू चालू आहे तो म्हणजे ‘एबीसीडी २’. त्याने या आठवड्यात १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. आनंद एल. राय यांचा ‘तनू वेड्स मनू रिटर्न’नंतर १०० कोटींचा व्यवसाय करणारा हा दुसरा चित्रपट. या आठवड्याचा व्यवसाय मिळून त्याने १०३ कोटींचा टप्पा ओलांडला. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही युवा प्रेक्षक वर्ग त्याच्याकडे आकर्षित होत आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित ‘हमारी अधुरी कहानी’ही ३४ कोटींचा व्यवसाय करून बॉक्स आॅफिसवर स्थिर झाला आहे. येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांत करण जोहर कंपनीमध्ये तयार झालेला दाक्षिणात्य चित्रपट ‘बाहुबली’ शिवाय टी-सीरिजचा चित्रपट ‘आय लव्ह न्यू ईअर’चा समावेश आहे. यात सनी देओल आणि कंगनाची जोडी आहे. हा चित्रपट दोन वर्षांपासून तयार होऊन पडला असून प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ‘क्वीन’ आणि ‘तनू वेड्स मनू रिटर्न’च्या यशानंतर यशाचा आनंद लुटणारी कंगना त्यात असूनही त्याच्या यशाची शक्यता जवळपास नाहीच.