कपिल शर्माच्या (Kapil Sharma) 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर सुरु झाला आणि जगभरात पोहोचला. नुकतंच शोचा पहिला सीझन संपला. नीतू कपूर, रणबीर कपूर, सनी देओलसह अनेक सेलिब्रिटींनी शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान कपिलचाच मित्र आणि कॉमेडियन सुनील पालने (Sunil Pal) शोवर टीका केली आहे. कलाकाराला साडी नेसवली म्हणून त्याने आक्षेप घेतला आहे.
टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत सुनील पाल कपिल शर्मा शोबद्दल बरंच काही बोलला आहे. शोमध्ये पुरुषांना साडी नेसवल्यावरुन तो संतापला आहे. ही अत्यंत वाईट कॉमेडी असल्याचं म्हणत त्याने कपिलला धारेवर धरलं आहे. सुनील पाल म्हणाला, "सुनील ग्रोवर बाईसारखं अभिनय करतो. पाहुण्यांच्या मांडीवर जाऊन बसतो. हे पाहून वाईट वाटतं. बाईचे कपडे घालतो आणि घाणेरड्या भाषेत बोलतो. हे अजिबातच चांगलं वाटत नाही. तसंच महिला इतक्या उत्साहित नसतात जितकं त्यात तो दाखवतो. कपिलने शोमध्ये असं काहीतरी दाखवण्याऐवजी काहीतरी चांगली कॉमेडी दाखवली पाहिजे."
तो पुढे म्हणाला, "नेटफ्लिक्स अडल्ट आणि अश्लील कंटेंटसाठी प्रसिद्ध आहे. कपिल शर्माला नेटफ्लिक्सने त्याचा शो या प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यासाठी काय लालच दिलं असेल याचा विचार करुन मला आश्चर्य वाटतं. ४० लेखक असूनही ते काहीही नवं आणू शकले नाहीत. शोमध्ये सगळेच थकलेले दिसत आहेत त्यांच्यात काहीच ऊर्जा नाही. कपिल वन मॅन शो आहे त्याने टीव्हीवर परत आलं पाहिजे."
कपिलचा शो नेटफ्लिक्सवर आल्यापासूनच त्याच्यावर टीका होत आहे. चाहत्यांचीही त्याने पुन्हा टीव्हीवर यावं अशी इच्छा आहे. सध्या शोचा पुढचा सीझन नेटफ्लिक्सवर येणार आहे. कपिलचा शो आता अनेक देशांमध्ये पोहोचतोय हीच याची जमेची बाजू आहे.