Join us

१९ ऑगस्टला मुंबईत येतोय, धमकीला घाबरत नाही; फिल्म निर्मात्याचा मनसेला प्रतिइशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:39 PM

हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही १९ ऑगस्टला मुंबईत येतोय. तुम्ही हल्ल्याची तयारी करा आम्ही सिनेमाची तयारी करतो असं फिल्म निर्माता अमित जानी यांनी म्हटलं आहे.

मुंबई – अलीकडेच पाकिस्तानी महिला सीमा हैदर प्रकरण भारतात प्रचंड गाजलं आहे. उत्तर प्रदेशातील सचिन नावाच्या मुलासाठी सीमाने नेपाळमार्गे बेकायदेशीर भारतात प्रवेश केला. सीमा-सचिन यांची लव्हस्टोरी देशात चर्चेत आली. तपास यंत्रणांनीही सीमा हैदर या पाकिस्तानी महिलेला चौकशीसाठी बोलावलं होतं. या संपूर्ण प्रकारावर कराची ते नोएडा असा सिनेमा येणार असून हा सिनेमा निर्माता अमित जानी बनवणार आहे. लवकरच या सिनेमाचे शूटींग सुरू होईल. परंतु या सिनेमावरून मनसेने खळ्ळखट्याकचा इशारा दिला. त्यावरून अमित जानी यांनीही मनसेला आव्हान दिले आहे.

फिल्म निर्माता अमित जानी म्हणाले की, सिनेमा निर्मात्यांनी धमकावणे, वसुली करणे हेच मनसेचे काम आहे. आम्ही हल्ल्याला घाबरत नाही. तुमची परवानगी घेऊन कुणाला शुटींग करायचे की नाही हे ठरवणार नाही. मनसेला या सिनेमाची अडचण नाही तर खरी अडचण हा सिनेमा यूपीत बनतोय, निर्माता यूपीचा, दिग्दर्शक यूपीचा, कलाकार यूपीचा हे आहे. यूपीचा मुलगा इतक्या मोठ्या विषयावर सिनेमा काढतोय हे मनसेच्या पचनी पडत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच हल्ल्याला आम्ही घाबरत नाही. आम्ही १९ ऑगस्टला मुंबईत येतोय. तुम्ही हल्ल्याची तयारी करा आम्ही सिनेमाची तयारी करतो. काही असाईनमेंट साईन करायचे आहेत. सिनेमासाठी जे कास्टिंग करायचे आहे ते मुंबईत बसून करणार आहोत. मुंबई तुमचं शहर आहे. आम्ही घाबरत नाही. तुम्ही अयोध्याला येणार होता. बृजभूषण सिंह यांनी येऊन दिले नाही. तुम्ही आला नाही. पण मी अमित जानी आहे. पृथ्वी इकडून तिकडे झाली तरी मी १९ ऑगस्टला मुंबईत येणार आहे. तुम्ही अमित जानीला त्याचे काम करण्यापासून रोखू शकत नाही. कोणी सिनेमा बनवायचा की नाही यासाठी तुमच्या परवानगीची गरज नाही असं प्रत्युत्तरही अमित जानी यांनी राज ठाकरेंचे नाव घेऊन दिले आहे.

काय होती मनसेची भूमिका?

पाकिस्तानी नागरिकाला भारतीय चित्रपटसृष्टीत कोणतंही स्थान असता कामा नये, या आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. सीमा हैदर ही पाकिस्तानी महिला सध्या भारतात आहे. ती ISI एजंट आहे अशा बातम्याही पसरल्या होत्या. आमच्या इंडस्ट्रीमधील काही उपटसुंभ प्रसिद्धीसाठी त्याच सीमा हैदरला अभिनेत्री बनवतायत. देशद्रोही निर्मात्यांना लाजा कशा वाटत नाहीत? हे असले तमाशे ताबडतोब बंद करा, नाहीतर मनसेच्या धडक कारवाईसाठी तयार रहा, असा जाहीर इशारा देतोय. ऐकल नाही तर राडा तर होणारच अशा शब्दात मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी इशारा दिला होता.

टॅग्स :मनसेराज ठाकरे