नेटफ्लिक्सची सर्वाधिक लोकप्रिय आणि हिट सीरिज ‘मनी हाईस्ट’ (Money Heist)चा 5 वा सीझन येतोय. साहजिकच या शोच्या प्रेमात असलेल्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा सीझन या शोचा शेवटचा सीझन आहे. त्यामुळे काहीही झालं तरी हा सीझन चुकवायचा नाही, असा अनेकांचा निर्धार झालायं. चाहते अगदी क्रेझी झाले आहेत. अशात जयपूरच्या एका कंपनीने काय तर हा शो पाहण्यासाठी आपल्या सर्व कर्मचा-यांना एका दिवसाची सुट्टी दिलीये.येत्या 3 सप्टेंबरला ‘मनी हाईस्ट 5’ (Money Heist 5) नेटफ्लिक्सवर स्ट्रिम होणार आहे. आपल्या सर्व कर्मचा-यांना ‘मनी हाईस्ट 5’ निवांतपणे पाहता यावी यासाठी जयपूरच्या वर्वे लॉजिक या कंपीनीने एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. ‘नेटफ्लिक्स अॅण्ड चिल हॉलिडे’च्या रूपात ही एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलीये.
कंपनीचे सीईओ अभिषेक जैन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. कधीकधी ब्रेक घेणं चांगलं असतं, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय कोव्हिड 19 काळात केलेल्या मेहनतीसाठी त्यांनी सर्व कर्मचा-यांचे आभार मानले आहेत.‘मनी हाईस्ट’चा 5 वा सीझन दोन भागात रिलीज केला जाणार आहे. 3 सप्टेंबरला पहिला भाग आणि 3 डिसेंबरला या सीझनचा दुसरा आणि शेवटचा भाग रिलीज होणार आहे. मूळ स्पॅनिश भाषेत असलेल्या ‘मनी हाईस्ट’चे चारही सीझन तुफान लोकप्रिय झालेत. चोरी करताना घातलेले मास्क आणि बेला चाओ हे गाणेही तुफान लोकप्रिय झाले. ‘मनी हाईस्ट’ ही मूळ स्पॅनिश भाषेतील वेबसीरिज आहे. नेटफ्लिक्सवर ती इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. अनोख्या कथेच्या जोरावर या वेबसीरिजने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. स्वत:कडे गमावण्यासारखे काहीच नसलेला एक प्रोफेसर विविध क्षेत्रातील आठ लोकांना एकत्र आणून चोरीचा मोठा प्लॅन आखतो, असे याचे मूळ कथानक आहे. या लक्षवेधी चोरीने तब्बल चार सीझन प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
नेटफ्लिक्सने खरेदी केले आणि नशीब बदलले...‘मनी हाईस्ट’ सर्वप्रथम स्पॅनिश टीव्हीवर दाखवण्यात आली होती. तेव्हा ही सीरिज फ्लॉप ठरली होती. विशेष म्हणजे मेकर्सने दुस-या सीझननंतर ही सीरिज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर नेटफ्लिक्सने ही सीरिज खरेदी केली आणि ती प्रचंड हिट झाली. सुरूवातीला या सीरिजचे प्रमोशनही झाले नाही. मात्र हळूहळू क्रेज इतके वाढले की, जगभरातील लोकांना या सीरिजने खिळवून ठेवले.