स्वरा भास्कर सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते. सामाजिक मुद्यांवर परखड मते मांडणारी स्वरा यावरून अनेकदा ट्रोलही झालीय. पण याने तिला काहीही फरक पडला नाही. पण आता स्वराविरोधात थेट कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. स्वरा धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे.स्वराविरोधात कानपूर न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. विजय बख्शी नामक व्यक्तिने ही याचिका दाखल केली आहे. येत्या 20 मार्चला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.
नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या पार्श्वभूमीवर स्वराने मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका चालवली आहे. याआधीही स्वरा भास्करने मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. लोकसभा निवडणुकीवेळी स्वराने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले होते. शेतक-यांची हत्या करणारे सरकार,असे तिने म्हटले होते. याशिवाय गेल्या काही दिवसांमध्ये जेएनयुमधील फी वाढीविरुद्धही तिने विद्यार्थ्यांची बाजू घेतली होती.
काय आहे याचिकेतील आरोपविजय बख्शी आपल्या याचिकेत स्वरावर गंभीर आरोप केले आहेत. स्वरा भास्कर एक सेलिब्रिटी आहे. पण तिचे वक्तव्य, तिची भाषणे आणि सोशल मीडिया पोस्ट समाजात द्वेष पसरवणा-या आहेत. भारत सरकार, सर्वोच्च न्यायालय, सुरक्षा संस्था सर्वांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करून ती समाजात द्वेष पसरवण्याचे व लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. यामुळे देशाची प्रतिमा मलीन होतेय. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाच्या प्रतिष्ठेला तडा जातोय, असे संबंधित याचिकेत म्हटले गेले आहे.