Join us

डोक्याला जबर मार, डावा खांदा निकामी; 'त्या' अपघातानंतर कोमामध्ये गेला होता जितेंद्र जोशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 2:42 PM

Jitendra joshi: एका पार्टीला जाणं जितेंद्रला चांगलंच महागात पडलं होतं.

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी (jitendra joshi). दर्जेदार अभिनयशैलीच्या जोरावर जितेंद्रने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अलिकडेच त्याच्या 'गोदावरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे तो चर्चेत येत आहे. यामध्येच आता लवकरच तो 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावणार आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये त्याने त्याच्या एका अपघाताविषयी सांगितलं. 

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमातील 'कानाला खडा' या राऊंडमध्ये जितेंद्रने त्याच्या जीवनातील एक कठीण प्रसंगाविषयी सांगितलं.  त्याचा मोठा अपघात झाला होता. ज्यामुळे तो जवळपास ७ दिवस कोमामध्ये होता. या अपघातानंतर त्याने कानाला खडा लावल्याचं त्याने सांगितलं.

"त्या अपघातानंतर आयुष्यात खूप मोठा खडा लागला. मी बाईक खूप वेगात चालवणारा मुलगा होतो. अगदी मुंबई-पुणे अंतर मी २ तास ४० मिनिटांत करायचो. मी हेल्मेट नियमित वापरायचो. पण, त्या दिवशी नेमकी माझ्या हेल्मेटची काच तुटली होती आणि एक मित्र आला. म्हणाला, अरे एक पार्टी आहे जायचं का? मी लगेच तयार झालो. काच तुटली होती त्यामुळे मी हेल्मेट घातलंच नाही. पार्टी वगैरे झाली अर्थात त्यावेळी ड्रिंक केलं होतं. आता मला फारसं आठवत नाही. पण, शैलेंद्र बर्वे माझा एक मित्र होता. तो म्हणाला की नको जाऊस गाडी घेऊनय मी त्याचं ऐकलं नाही. आणि बाईक घेऊन निघालो. तो आजही म्हणतो, त्यावेळी तुझ्या गाडीची चावी काढून घ्यायला हवी होती", असं जितेंद्र म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "अत्यंत मूर्खपणा केला मी. आणि, त्याचवेळी माझा खूप मोठा अपघात झाला. जवळपास ७ दिवस मी कोमामध्ये होतो. माझा डावा खांदा गेला. या अपघातामुळे माझा आत्मविश्वास पूर्णपणे गेला होता. मी शिवाजी मंदिरवर यायला सुद्धा घाबरायचो. मला लाज वाटत होती. माझी आईसुद्धा खूप त्रासली या सगळ्यात. पण, या सगळ्यातून मला  संजय मोने या माणसाने बाहेर काढलं. हे मी कधीच विसरु शकत नाही."

टॅग्स :जितेंद्र जोशीमराठी अभिनेतासेलिब्रिटी