Kangana Ranaut Loksabha Election 2024: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) काही ना काही विधानांमुळे सतत चर्चेत असते. शिवाय सामाजिक विषयांवर आणि राजकारणावर कंगना काम मत मांडते. तिचे राजकीय विचार पाहता कंगना लोकसभा निवडणूक लढेल अशीच अनेकांना शंका होती. आता यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कंगनाचे वडील अमरदीप रणौत यांनी कंगना 2024 लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
कंगना रणौतने दोनच दिवसांपूर्वी कुल्लू येथील आपल्या घरी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर कंगना निवडणूक लढवणार या चर्चांना उधाण आलं होतं. News 18 पोर्टलने अमरदीप रणौत यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले,'कंगना भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवेल. मात्र ती कोणत्या जागेवरुन लढेल हे पक्षच ठरवेल.'
गेल्या आठवड्यात हिमाचलच्या बिलासपूरमध्ये राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात कंगनाही हजर होती. तिने संघाची विचारधारा ही माझ्या विचारांशी जुळते असे स्पष्ट केले होते. कंगना मंडी लोकसभा किंवा चंदिगढमधून निवडणूक लढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. कंगना रणौत मंडी जिल्ह्यातील सरकाघाट विधानसभा क्षेत्रातील भांबला गावाची राहणारी आहे. तिचं मनालीतही घर असून आता संपूर्ण कुटुंब मनालीतच वास्तव्यास आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातच्या द्वारकामध्ये माध्यमांशी बोलताना तिने देवाची कृपा असेल तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले होते.
कंगनाच्या चित्रपटांविषयी बोलायचं तर 2023 हे वर्ष तिच्यासाठी खास ठरलं नाही. तिचे 'तेजस', 'चंद्रमुखी 2' हे दोन्ही चित्रपट फारसे चालले नाहीत. लवकरच ती 'इमर्जन्सी' सिनेमात झळकणार आहे. यामध्ये तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. या सिनेमासाठी कंगनाने तिची संपत्तीही दावणीला लावली असल्याचं तिने सांगितलं होतं.