- प्राजक्ता चिटणीसगायिका नेहा कक्करने ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कार्यक्रमात ती स्पर्धक म्हणून झळकली होती आणि आता ती ‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या तिच्या प्रवासाबद्दल तिच्याशी मारलेल्या गप्पा...तू इंडियन आयडल या रिअॅलिटी शोद्वारे तुझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होतीस, आज तुला सारेगमपा लिटिल चॅम्प्स या रिअॅलिटी शोचे परीक्षण करायला मिळत आहे. तुला कसे वाटत आहे?- मी एका रिअॅलिटी शोद्वारे आल्यामुळे माझ्यासाठी रिअॅलिटी शो हे खूप जवळचे आहे. मला कोणत्या तरी रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाची भूमिका साकारायला मिळावी अशी माझी नेहमीच इच्छा होती. सारेगमपा लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमामुळे माझी ही इच्छा पूर्ण झाली आहे.गाणे म्हणणे आणि गाण्यांचे परीक्षण करणे यात तुला काय फरक जाणवतो?- ज्या वेळी तुम्ही एक चांगले गायक असता, त्यावेळी तुम्हाला सगळ्या तांत्रिक गोष्टी चांगल्याप्रकारे माहीत असतात. त्यामुळे परीक्षण करणे कठीण जात नाही. पण लहान मुलांच्या गायनाचे परीक्षण करणे हे तितकेसे सोपे नसते. कारण कोणतीही गोष्ट त्यांच्या मनाला लागू नये यासाठी त्यांना खूप चांगल्याप्रकारे समजावून सांगावे लागते. त्यामुळे इमोशनली आमच्यासाठी ते आव्हानात्मक असते. तू एका रिअॅलिटी शोद्वारे इंडस्ट्रीत आली आहेस, तुझ्या मते, रिअॅलिटी शो करिअरसाठी कितपत महत्त्वाचे असतात?- तुम्ही ज्यावेळी एखाद्या छोट्याशा गावातून येता, त्या वेळी कोणत्याही मोठ्या संगीतकाराला जाऊन भेटणे, त्याच्यासमोर तुमची कला सादर करणे हे तुमच्यासाठी खूप कठीण असते. पण रिअॅलिटी शोमुळे अनेक दिग्गज तुम्हाला ऐकतात, त्यांना भेटण्याची संधी तुम्हाला मिळते, त्यामुळे तुमच्यासाठी इंडस्ट्रीचे दरवाजे खुले होतात. मी तर सोळाव्या वर्षीच इंडियन आयडॉलचा भाग झाले होते. या कार्यक्रमाने मला खूप काही मिळवून दिले.रिअॅलिटी शो जिंकणे अथवा हरणे हे स्पर्धकाच्या करिअरवर किती प्रभाव टाकते?- स्पर्धा जिंकणे अथवा हरणे हे महत्त्वाचे आहे असे मला वाटत नाही. कारण तुम्ही खूप सुरुवातीच्या काळात जरी कार्यक्रमातून बाद झालात, पण तुमच्याकडे टॅलेंट असेल, तुमचा आवाज चांगला असेल, तर लोक तुमच्यासोबत काम करण्यास तयार असतात. त्यामुळे जिंकणे, हरणे या गोष्टी दुय्यम आहेत, असे मला वाटते. मी तर इंडियन आयडलमधून खूप सुरुवातीलाच बाहेर पडले होते. पण नंतरच्या काळात मला माझ्या टॅलेंटमुळे यश मिळाले.तू नुकत्याच एका लग्नसमारंभात गायला गेली होती. तिथे तुझी तब्येत बिघडल्यानंतरही तू गावे असे आयोजकांचे म्हणणे होते याबद्दल काय सांगशील?- माझी तब्येत खूप खराब असूनही मी जवळजवळ एक तास गायले. मी खूपच चांगल्याप्रकारे परफॉर्म केले होते. पण माझी तब्येत जास्त बिघडल्यावर मी आता गाऊ शकत नाही असे उपस्थितांना सांगितले. त्यावर मी गायलेच पाहिजे असे आयोजकांचे म्हणणे होते. माझी तब्येत खराब असूनही त्यांनी मला समजून न घेतल्याने मला खूप वाईट वाटले आणि मी स्टेजवरच रडायला लागले. कलाकार हादेखील माणूस असतो याचा विचार लोकांनी करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
‘कार्यक्रम जिंकणे किंवा हारणे या गोष्टी दुय्यम असतात’
By admin | Published: March 04, 2017 2:18 AM