ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांना नक्षलवाद्यांकडून धमकी देण्यात आली आहे. नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करू नये, अशी धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे.
छत्तीसगडमधील सुकमा येथे मार्च महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. या शहिदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची घोषणा अक्षय कुमार आणि सायना नेहवाल यांनी केली होती. त्यानुसार
अक्षयनं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 9 लाख रुपये तर सायना नेहवालनं प्रत्येक कुटुंबाला 50 हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करणारी पत्रके वाटली आहेत. पत्रकात ""पीपल्स लिबरेशन ऑफ गुरिल्ला आर्मी""नं अक्षय व सायनानं शहीद जवानांच्या कुटुंबीयांना केलेल्या आर्थिक मदतीचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करु नये अथवा परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली आहे.
नक्षलवाद्यांनी पत्रकात असेही म्हटले आहे की, ""सीआरपीएफचे जवान हे मानवाधिकाराचे शत्रू आहेत. त्यांना बस्तरमधील आदिवाशांना संपवण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. अशातच या लोकांना मदत करणा-यांचा आम्ही निषेध करतो आणि शहीद जवानांच्या कुटुंबीयांना पुन्हा मदत करू नये, असा इशाराही देत आहोत, नाही तर परिणाम वाईट होतील"".
24 एप्रिल रोजी नक्षलग्रस्त भागातील रस्ते कामाच्या गस्तीवर असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर 300 नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. यात कमांडर रघुवीर सिंह यांच्यासह 25 जवान शहीद झाले होते. सुकमा जिल्ह्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता.
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी दुपारी 12.15 वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला होता. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली होती. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
सोमवारीस सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी 12 वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला.