बॉलिवूडनंतर ओटीटीवर सरकारची करडी नजर आहे. अलीकडे अॅमेझॉन प्राईमवर रिलीज ‘तांडव’ या वेबसीरिजवरून मोठा वाद झाला होता. आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेली ‘बॉम्बे बेगम्स’ ही वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या सीरीजचे स्ट्रिमिंग थांबवण्याचे आदेश देत 24 तासांच्या आत यासंदर्भात अहवाल मागितला आहे. असे न केल्यास, आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
गुरुवारी या आयोगाने नेटफ्लिक्सला नोटीस बजावले. सीरीजच्या निर्मात्यांना आपला तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश या नोटीसद्वारे देण्यात आले आहे. 24 तासांच्या आत हा अहवाल सादर केला नाही तर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही या नोटिसमध्ये दिला आहे. सीरिजमधील काही दृश्यांवर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने आक्षेप नोंदवला आहे. एका तक्रारीच्या आधारावर आयोगाने ही कारवाई केली आहे.
का बजावले नोटीसतक्रारीनुसार, ‘बॉम्बे बेगम्स’ या वेबसीरिजमध्ये एका 13 वर्षाच्या मुलीला ड्रग्ज घेताना दाखवले आहे. शिवाय अल्पवयीन मुलांना कॅज्युअल सेक्स करण्यात दाखवण्यात आले. शालेय मुलांबाबतची सीरिजमधील ही दृश्ये प्रचंड आक्षेपार्ह असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारावर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने नेटफ्लिक्सला नोटीस बजावले आहे. ‘बॉम्बे बेगम्स’ ही वेबसीरिज अलंकृता श्रीवास्तवने दिग्दर्शित केली आहे. यात पूजा भट, सुहाना गोस्वामी, अमृता सुभाष, प्लाबिता बोर-ठाकूर, आध्या आनंद महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या वेबसीरीजमध्ये समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या ५ स्त्रियांची आयुष्ये दाखवली आहेत.