'सिटीलाईट', 'ट्रॅप्ड', 'क्वीन', 'न्यूटन', 'शादी में जरूर आना', 'ओमेर्टा' व 'फन्ने खान' या सिनेमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारा अभिनेता राजकुमार राव आगामी 'स्त्री' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल व त्याच्या आगामी सिनेमांबद्दल त्याच्याशी केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
तुझ्या 'ओमेर्टा' व 'फन्ने खान' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल काय सांगशील?'ओमेर्टा' सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच लोकांना चित्रपटातील माझा अभिनय देखील खूप भावला. यातील माझी भूमिका वेगळी होती आणि माझ्यासाठी देखील एक वेगळा अनुभव होता. 'फन्ने खान' चित्रपटाला मिक्स रिव्ह्यू मिळालेत आणि त्यातील पण माझे कामही प्रेक्षकांना खूप आवडले. आता मी माझा आगामी सिनेमा 'स्त्री'साठी खूप उत्सुक आहे.
तुझा आगामी 'स्त्री' चित्रपटाबद्दल सांग?हॉरर कॉमेडी जॉनरचे बॉलिवूडमध्ये खूप कमी चित्रपट बनले आहेत. अक्षय कुमारचा 'भुलभुलैया' चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर आता आमचा 'स्त्री' हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. यातील विनोदी भाग अक्षरशः लोकांना खळखळून हसायला भाग पाडेल. भीतीदायक सीन आहेत त्यात घाबरायला होणार आहे. यात हॉरर व कॉमेडीचा खूप छान समतोल साधला आहे.
'स्त्री'मधील तुझ्या भूमिकेबद्दल सांग?'स्त्री' मधील माझी भूमिका चॅलेंजिंग होती. कारण मी साकारीत असलेले पात्र मध्यप्रदेशमधील असल्यामुळे मला तिथली भाषा शिकायला लागली. मी प्रोफेशनने टेलर दाखवलो आहे. त्यामुळे मला टेलरिंग शिकायला लागले.
'मर्द को दर्द नहीं होता...' असे आम्ही ऐकले आहे, तर मर्द को दर्द होता है... या टॅगलाईनमधून नेमके काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे?मर्द को दर्द तो होता है ही टॅगलाईन चित्रपटाच्या कथेशी निगडीत आहे. आमच्या शहरात एक स्त्री चार दिवसांसाठी आली आहे ती पुरूषांना उचलून घेऊन जाते. त्याचे कपडे तिथे सोडून जाते. हे चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा अर्थ समजेल.
'स्त्री' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी तुला काही वेगळे अनुभव आले का?आम्ही भोपाळमध्ये शूटिंग करत होतो. तिथे एक हॉण्टेड किल्ला आहे. तिथे जाताना आम्हाला काही अटी घालण्यात आल्या होत्या. परफ्युम लावायचे नाही. केस मोकळे सोडायचे नाहीत. मोठ्या आवाजाने बोलायचे नाही असे सांगितले होते. तिथे काहींना भयानक अनुभव आले. आमचा लाइट बॉय तिथून पंधरा फूट उंचीवरून पडला होता. त्याला समजले नाही की तो कसा पडला की कोणी त्याला ढकलले हे माहित नाही. त्यामुळे तिथल्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर थोडी भीती वाटत होती.
श्रद्धा कपूर सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?श्रद्धा कपूरसोबत काम करायला खूप मजा आली. ती खूप चांगली अभिनेत्री आहे. ती खूप सुंदर आहे. या चित्रपटातून ती एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि लोकांना या भूमिकेत ती नक्कीच आवडेल.
दिग्दर्शक अमर कौशिक यांच्याबद्दल काय सांगशील?अमर कौशिक मला भावासारखे आहेत. त्यांच्यासोबत नेहमीच मला काम करायला आवडेल. त्यांना त्यांचे काम कसे करून घ्यायचे ते माहित आहे. सेटवरील सर्वांची ते खूप काळजी घ्यायचे.
'मिलेंगे मिलेंगे' या गाण्यात तू साडी नेसून नाचताना दिसतो आहेस, हा अनुभव कसा होता?'मिलेंगे मिलेंगे' हे गाणे खूप छान झाले असून यापूर्वी मी बरेली की बर्फी चित्रपटात साडी नेसली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने मी दुसऱ्यांदा साडी नेसली आहे. त्यामुळे आधीच्या चित्रपटाचा अनुभव इथे कामी आला. साडीत डान्स करणे कठीण होते.
तू चित्रपट निवडताना तू काय पाहतोस?मी चित्रपट निवडताना माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची कथा आहे. त्यामुळे मी सर्वात आधी कथा वाचतो. ती कथा मला एक कलाकार म्हणून किती उत्सुक करते आहे हे मी पाहतो. त्यानंतर त्या कथेत माझी काय भूमिका आहे, हे मी पाहतो. तसेच ती भूमिका मला काही वेगळे करण्यासाठी प्रवृत्त करते का या गोष्टी पाहून मी चित्रपट निवडतो.
तू तुझ्या करियरच्या बाबतीत किती समाधानी आहेस?मी अजिबात समाधानी नाही. पण मी खूश आहे कारण मला खूप चांगल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटातून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. कलाकार म्हणून मी प्रगल्भ झालो आहे. अशाच चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत राहावे.
आगामी 'मेंटल है क्या' चित्रपटाबद्दल सांग?'मेंटल है क्या' चित्रपटाबद्दल आता बोलणे उचित नाही. हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. खूप इंटरेस्टिंग कथा आहे. मी आणि कंगना रानौत 'क्वीन' चित्रपटानंतर एकत्र दिसणार आहोत. त्यामुळे या चित्रपटाबाबत मी खूप उत्सुक आहेत.
'मेड इन चायना' चित्रपट कशावर भाष्य करतो?या चित्रपटाबद्दल मी आता बोलू शकत नाही. यात मी गुजराती स्ट्रगलिंग बिझनेसमॅनची भूमिका करतो आहे. जगभरात जे प्रोडक्ट पाहायला मिळतात. त्यावर बहुतांश मेड इन चायना असे लिहिलेले असते. आम्ही विचार केला की या चित्रपटाचे शीर्षक याहून चांगलं असू शकत नाही.