कोरोना संकट, त्यात 21 दिवसांचे लॉकडाऊन. अशात लोक रस्त्यावर नाही तर सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसताहेत. सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या काळातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लॉकडाऊनमध्ये विनाकारण घराबाहेर फिरणा-या व पोलिसांचे फटके खाणा-यांच्या व्हिडीओंचा जणू पूर आला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओची खास बात म्हणजे, यात पोलिसांचे फटके खाणारी व्यक्ती बॉलिवूडचा मोठा दिग्दर्शक असल्याचा दावा केला जात आहे. हा दिग्दर्शक कोण तर बॉलिवूड दिग्दर्शक सुधीर मिश्रा. होय, व्हिडीओतील पोलिसांचा प्रसाद खाणारी व्यक्ती सुधीर मिश्रा आहे, असा दावा हा व्हिडीओ शेअर करणा-यांनी केला आहे.अर्थात आम्ही सांगू इच्छितो की, व्हिडीओतील व्यक्ती सुधीर मिश्रा नाहीत. त्यांनी स्वत: तसा खुलासा केला आहे. पण सोशल मीडियावर मात्र नेटक-यांनी सुधीर मिश्रा यांना टॅग करत, हा व्हिडीओ शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. या व्हिडीओवरून सुधीर यांना ट्रोलही केले जातेय. ‘लॉकडाऊनमध्ये अर्बन नक्सल सुधीर मिश्रा को पुलिस का डंडा पूजन मिला,’ अशा अनेक कमेंट्स यावर पाहायला मिळत आहेत. ‘हार्ड बहुत हार्ड... टुकडे टुकडे गँगचा पॅटरन आणि अनुराग कश्यपचा गुरु़ सुधीर मिश्राला मिळाले फटके,’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.
सुधीर मिश्रांनी ट्रोलर्सला सुनावले
हा व्हिडीओ शेअर होताच सुधीर मिश्रा यांनी ट्विट करून व्हिडीओतील पोलिसांचा मार खाणारी पांढ-या केसांची व्यक्ती आपण नसल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय ट्रोल करणा-यांनाही सुनावले आहे. ‘कुठल्याहीप्रकारे रिअॅक्ट न होता मी मार खाईल, असा विचार लोक करू शकतात, हे पाहून मला हसू येतेय. प्रत्येक पांढ-या केसांचा उंचपूरा माणूस मी नाही. ट्रोल ब्रिगेडचा आनंद पाहून मी चकीत झालोय. किती घाणेरडी मानसिकता आहे ही. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्यांनो, मार खाणारा भेकाड मी नाही. आयुष्यात करण्यासाठी चांगले काम शोधा,’ असे सुधीर मिश्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
आणखी एका ट्विट करून या व्हिडीओवरचा संतापही त्यांनी बोलून दाखवला आहे. ‘अबे, मी असा मार खाऊ शकतो का? प्रत्येक पांढ-या केसांचा माणूस सुधीर मिश्रा असतो का? तसेही व्हिडीओतील तो जास्त गोरा आहे. लठ्ठ आहे आणि चालण्यात ती लचक नाहीये, असे त्यांनी लिहिले आहे.’
सुधीर मिश्रा बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक व लेखक आहेत. 1983 मध्ये प्रदर्शित जाने भी दो यारों या चित्रपटाच्या पटकथा लेखनापासून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. 1987 मध्ये त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. ये वो मंजिल तो नहीं हा त्यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा. यानंतर मैं जिंदा हूं, धारावी, इस रात की सुबह नहीं, चमेली, हजारों ख्वाहिशें ऐसी असे अनेक चित्रपट त्यांनी केलेत.