-तर पुन्हा बनवावा लागणार कोट्यावधीचा सेट, लॉकडाऊनने वाढवली ‘थलायवी’च्या मेकर्सची चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:38 PM2020-04-27T14:38:33+5:302020-04-27T14:39:56+5:30
कंगना राणौतच्या आगामी चित्रपटालाही लॉकडाऊनचा फटका
कोरोना आणि लॉकडॉन यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. उद्योगधंदे बंद असल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. मनोरंजन उद्योगही याला अपवाद नाही. कंगना राणौतच्या आगामी चित्रपटालाही लॉकडाऊनचा जबर फटका बसला आहे. होय, लॉकडाऊनमुळे शूटींग बंद पडल्याने कंगनाच्या ‘थलायवी’ या चित्रपटाच्या निर्मात्याला 5 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे कळतेय.
बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत लवकरच ‘थलायवी’ या बायोपिकमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकसाठी हैदराबाद स्टुडिओत संसद भवनाचा सेट साकारण्यात आला होता. या सेटवर 45 दिवस शूट होणार होते. पण सेट बनून तयार झाला आणि नेमक्या त्याच काळात लॉकडाऊन लागू झाले. यामुळे या सेटवर एकही दिवस शूट होऊ शकले नाही़. पण स्टुडिओचे भाडे आणि या सेटचा मेंटनन्स या पोटी निर्मात्याला मात्र कोट्यवधीचे नुकसान सोसावे लागतेय.
काहीच दिवसात पावसाळी सुरु होणार आहे. पाऊस सुरु होताच हा सेट खराब होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास निर्मात्याला पुन्हा नवा सेट बनवावा लागेल, त्यासाठी पुन्हा नव्याने पैसा ओतावा लागेल. हा सेट बनवण्यासाठी मेकर्सने कोट्यावधी रूपयांचा खर्च केला होता. अशात तो पुन्हा उभारावा लागल्यास मेकर्सला नवा भुर्दंड सहन करावा लागेल. अशात ‘थलायवी’चे मेकर्स लॉकडाऊन कधी एकदा उघडतो, याकडे डोळे लावून बसले आहेत.
‘थलायवी’हा बायोपिक तामिळ, तेलुगू आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी कंगनाने 20 कोटी रुपये मानधन स्वीकारल्याचे कळतेय. जयललिता यांच्याप्रमाणे हुबेहूब दिसण्यासाठी कंगनाने प्रचंड मेहनत घेतली असून तिला प्रोस्थेटिक मेकअपचा आधार घ्यावा लागला होता. या मेकअपचे काही फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.