Join us

Coronavirus : जनता कर्फ्यूसाठी सेलिब्रेटी करताहेत आवाहन, सोशल मीडियावर शेअर केल्या पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 7:00 PM

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर कलाकारांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याचे आवाहन केल्यानंतर कलाकारांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. कोरोना विषाणूविरुद्ध लढा देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन सेलिब्रेटी सोशल मीडियावर व्हिडिओ व मेसेज पोस्ट करून करत आहेत. यामध्ये विनोदवीर कपिल शर्मापासून मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांनी कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या चाहत्यांना अपील केले आहे.कपिल शर्माने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने म्हटले की, कोरोना व्हायरस पूर्ण जगात मोठ्या संख्येने पसरत आहे. कोरोना व्हायरसला रोख लावण्यासाठी सरकार व डॉक्टर दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे देखील सरकार व डॉक्टर दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपणही यात आपलं योगदान दिले पाहिजे. आपण आपलं योगदान कसे देऊ तर घरात राहून. खूप महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. आपले हात स्वच्छ ठेवा, दिवसात आठ ते दहा वेळा हात धुवा.

तसेच या व्हिडिओत बोलताना कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना व्हायरस विरूद्ध लढण्यासाठी गुरूवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचे आवाहन केले आहे. त्याला देखील सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील बलराम व श्रीराम यांची गोष्ट सांगत आपल्या चाहत्यांना कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी आवाहन केले आहे.

सोनाली म्हणाली की, सध्या आपण फारच विचित्र वातावरणात आहोत. इथे आपल्याला आपला राक्षस दिसत नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्याला घाबरण्याची गरज नाही असं वाटत आहे. पण जे शत्रू आपल्याला दिसत नाही त्यांना आपल्याला घाबरण्याची गरज असते. या सगळ्यांतून वाचण्यासाठी नियमांचे पालन करा व घरातून बाहेर पडू नका असे आवाहन तिने केले आहे.

अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनीदेखील 22 मार्चला जनता कर्फ्यूला पाठिंबा देत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

भरत जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना अपील केले आहे. त्यांनी सांगितले की, जगभरात कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोरोना हटविण्यासाठी सरकार व डॉक्टर प्रयत्न करत आहेत. घरात वृद्धांची काळजी घ्या. काम असेल तरच बाहेर पडा. 22 मार्चला घरी राहण्याची शपथ घ्या. स्वतःला आणि दुसऱ्यालाही जपा.

जुई गडकरी हिने देखील भारतातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची चिंता व्यक्त केली आहे. त्यासोबतच तिने तिच्या चाहत्यांना घरात थांबण्याचे आवाहन केले आहे.

जगभरात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दिवसांदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 63 वर पोहोचली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासोनाली कुलकर्णीकपिल शर्मा भरत जाधवजुई गडकरी