कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग दहशतीत आहे़ अनेक देशात लॉकडाऊन आहे. अर्ध्या जगाचा कारभार जणू ठप्प पडलाय. आपल्या देशातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. भारतात कोरोनाचा आकडा दिवसागणिक वाढतोय. कोरोनाच्या भीतीने प्रत्येकजण घरात कैद आहे. पण अशातही पोलिस, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र या अदृश्य शत्रूशी लढत आहेत. असंख्य हात गरजूंच्या मदतीसाठी खपत आहेत तर अनेकजण वेगवेगळ्याप्रकारे या संकटाच्या काळात लोकांची उमेद वाढवत आहेत. अभिनेता जॉन अब्राहम त्यापैकीच एक.होय, जॉनने त्याच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जॉनच्या आवाजातील कविता ऐकू येतेय. या कवितेत फ्रंटलाइन वर्कर्स, पोलिस आणि कोरोना संकटाच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.ही कविता ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप जवेरीने लिहिली आहे. ही कविता ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर शहारे येतील.
‘सडके है लावारिस, घर पर बैठा इन्सान है, जहां खेलते ते सब बच्चे अब खाली वो मैदान है...मंदिर और मस्जिद है बंद खुली राशन की दुकान है,हौसला फिर दिलों में क्यूंकि मेरा भारत महान है...’ अशी ही कविता आहे.
हा व्हिडीओ शेअर करताता जॉन म्हणतो, मिलाप ही कल्पना घेऊन माझ्याकडे आला तेव्हा हे मलाच करायचे आहे, हे माझ्या लक्षात आले होते. समाजात सकारात्मकता पेरण्याचा, एकमेकांना प्रेरणा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण जिंकू आणि नक्की जिंकू हा विश्वास आहे.