पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्याबाबत एका व्हिडिओच्या माध्यमातून देशातील लोकांना आवाहन केले. मोदी यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला 5 एप्रिलला रात्री 9 वाजता मेणबत्ती, टॉर्च किंवा दिवा जळवण्याचे आवाहन केले आहे. मोदी यांच्या या आवाहनाचे बॉलिवूडच्या कलाकारांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यात आता अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेदेखील मोदींच्या या व्हिडिओवर रिएक्शन दिली आहे. तिने ट्विटच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवा व मेणबत्तीच्या माध्यमातून कोरोनाच्या अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याच्या आवाहानावर स्वरा भास्करने म्हटलं की, थाळी वाजवा, टाळी वाजवा, दिवे लावा, टॉर्च लावा...सर्व करा पण हे लक्षात ठेवा की हॉस्पिटलमध्ये डॉक्टर, नर्स व मेडिकल कर्मचारी आहेत ज्यांना या प्रदर्शनापेक्षा जास्त ग्लोव्हज, मास्क यांसारख्या त्यांच्या सुरक्षेची सामग्री हवी आहे त्यांचा जीव वाचवण्यासाठी जेणेकरून ते कोरोना व्हायरसपासून देशाला वाचवू शकतील.
पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी सकाळी ११ मिनिटांच्या व्हिडीओ संदेशातून हा संवाद साधला आणि सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन केले. मोदी म्हणाले की, सामाजिक अंतर राखण्याची ‘लक्ष्मण रेषा’ ओलांडू नका. कारण, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे. मोदी म्हणाले की, दिवे लावण्यासाठी कोणीही कुठेही एकत्र व्हायचे नाही. रस्त्यांवर, गल्लीत एकत्र यायचे नाही. आपल्या घरातील दरवाजासमोर, बाल्कनीतच दिवे लावायचे आहेत. १३० कोटी देशवासीयांचा महासंकल्प एका नव्या उंचीवर घेऊन जायचा आहे. त्यासाठी रविवारी, ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता आपल्या घरातील सर्व लाइट बंद करा आणि घराच्या दरवाजासमोर अथवा बाल्कनीत उभे राहून ९ मिनिटांसाठी दिवे, टॉर्च, मेणबत्ती किंवा मोबाइलची फ्लॅश लाइट सुरू करा.