मुंबई - कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशानं युद्धाप्रमाणे तयारी केली आहे. प्रत्येक देशवासीय आपल्या परीने या लढाईत योगदान देत आहे. कुणी घरी बसून, कुणी गरिबांना मदत करुन तर कुणी पोलीस बांधवांसाठी कृतज्ञता व्यक्त करुन मदत करत आहे. पोलिसांवरील ताण या काळात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लोकांना आवरताना पोलिसांशी अनेकदा हुज्जत घातली जात आहे. त्यातच, आता अभिनेता ऋषी कपूरने राज्यात दारुला परवानगी देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या मागणीला दिग्दर्शक कुणाल कोहलीनेही खो दिला आहे. किंवा सकाळी ९ ते २ या वेळात परवानगी द्यावी, अशी मागणी फना चित्रपटाचा दिग्दर्शक कुणाल कोहलीने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकाडाऊ केला असून नागरिक घरीच बसून आहेत. त्यातच, कोरोना रुग्णांची संख्या ९०० वर पोहोचली असून मृतांचा आकडा २० वर पोहोचला आहे. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य न बाळगता काही अभिनेते बरळत आहेत. लॉकडाऊन काळात अभिनेता ऋषी कपूरने अजबच मागणी केली आहे, या मागणीमुळे ऋषी कपूर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येतंय. विशेष म्हणजे त्यांच्या या मागणीला कोहलीने समर्थन दिलंय. लॉकडाऊन काळात राज्य सरकारने संध्याकाळच्या वेळेत दारुची सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली पाहिजे, मला चुकीचं समजू नका. पण, सध्या घरी बसून लोकं ताण-तणावात जगण्यासाठी हतबल झाली आहेत. डॉक्टर आणि पोलिसांनाही तणावापासून मुक्ती हवी आहे, तसं पाहिलं तर ब्लॅकने विकल्या जात आहेच, असे ट्विट ऋषी कपूरने केले आहे. विशेष म्हणजे ऋषी कपूरच्या या ट्विटचे दिग्दर्शक कुणाल कोहलीनेही समर्थन केले आहे. संध्याकाळी शक्य नसेल तर, सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंतच्या वेळात सरकारने दारुविक्रील परवानगी द्यावी, राज्यासाठी कर महत्वाचं असल्याचं कोहलीने म्हटलंय.
विशेष म्हणजे राज्य सरकारला सध्या दारुच्या करातून मिळणाऱ्या पैशांची मोठ्या प्रमाणात गरज आहे, त्यामुळे दारुला या काळात कायदेशीर मान्यता द्यावी, असेही ऋषी कपूरने म्हटले आहे. दरम्यान, ऋषी कपूर यांच्या या मागणीनंतर नेटीझन्सने त्यांना चांगलच ट्रोल केलं आहे. अनेकांनी ऋषी कपूरला परिस्थितीचं गांभीर्य नसल्याचं म्हटलंय, तर काहींनी असं केल्यास दारुच्या दुकानाबाहेर गर्दी होऊन परिस्थिती आटोक्यात आणणं शक्य होणार नसल्याचं म्हटलंय. तसेच, अशा परिस्थिती दारु प्यायल्याने ताण-तणाव कमी होत नसून वाढतोच, असेही काहींनी म्हटले आहे.