Join us

रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 11:34 AM

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रवीना टंडनच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. बोरीवली मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. रवीना टंडनच्या विरोधात चौकशी करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आले आहेत. बोरीवली मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. रविनावर सोशल मीडियावरील व्हिडिओ हटवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत दाखल केलेल्या एका याचिकेबाबत कोर्टाने दखल घेत हे आदेश दिले आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

रवीना टंडनच्या विरोधात मोहसीन शेख यांनी एक याचिका दाखल केली होती. जून महिन्यात रविनाचा एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये तिने मद्यधुंद अवस्थेत दोन महिलांवर कार चढवण्याचा प्रयत्न तसेच मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात रवीना टंडनला क्लीन चीट मिळाली होती. रवीना टंडनची गाडी रिव्हर्स घेत असताना चार व्यक्ती अचानक गाडीसमोर आल्याचं म्हटलं गेलं होतं. याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. 

याप्रकरणी रवीना टंडने हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर करणाऱ्या मोहसीन शेख यांना मानहानीची नोटीस पाठवली होती. या व्हिडिओमुळे प्रतिमा मलिन झाल्याचा दावा रवीनाने केला होता. याप्रकरणी मोहसीन शेख यांनी रवीनाविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावरील व्हिडिओ डिलीट करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप रवीनावर करण्यात आला होता. त्याबरोबरच अभिनेत्रीने १०० कोटींचा मानहानी दावा केल्याचंही त्याने म्हटलं होतं. रवीनाने फोनवर अनेक राजकीय नेत्यांची नावं घेऊन धमक्या दिल्याचा आरोपही त्याने केला होता. 

रवीना टंडनची या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ५००, ५०४ आणि ५०६ नुसार चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मोहसीन शेख यांच्या वकिलांनी केली होती. त्यानुसार, बोरीवली मॅजिस्ट्रेट कोर्टाने रवीना टंडनच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :रवीना टंडनन्यायालयसेलिब्रिटी