उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि राज्यात नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत आपण मुख्यमंत्री पदाचा त्याग करत असल्याचे जाहिर केले. अतिशय भावुक भाषण करत त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कामाची प्रशंसा करत त्यांना पाठींबा दिला. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनेदेखील ट्विटरवर पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे.
स्वरा भास्करने ट्विटमध्ये लिहिले की, उद्धव ठाकरे, तुमच्या नेतृत्वासाठी आभारी आहे. कोरोना संकटाच्या काळात तुम्ही निःपक्षपाती आणि राज्याचे जबाबदार, पारदर्शक, संवाद साधणारे आणि आश्वासन देणारे नेते होतात. या सर्व गोष्टींमुळे माझ्यासारख्या टीकाकारही प्रशंसक बनला. तुमच्या नेतृत्वात झालेले प्रशासकाचे कार्य प्रशंसनीय आहे. तुमचा प्रवास दूरपर्यंत आणि चांगला होवो.
काय म्हणाले उद्धव ठाकरे...सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीचा राज्यपालांचा निर्णय योग्य ठरवल्यानंतर जनतेशी संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली. मी आलोच अनपेक्षितपणे. जातो पण तसाच आहे. मी पुन्हा येईन, म्हणालो नव्हतो, असे सांगतानाच उद्धव यांनी बंडखोर शिवसेना आमदारांवर आगपाखड केली. माझ्या विरोधात एक जरी उभा झाला तरी मला लाजिरवाणे आहे. मला उद्याचा खेळच करायचा नाही.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना आपलीच आहे. ती आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आता नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. दृष्ट लागली एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागते. जे जाणार, जाणार म्हणत होते ते सोबत राहिले, असे सांगतानाच कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहकार्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.