मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मराठीच नाही तर हिंदी सिनेप्रेमींची मनंही त्याने आपल्या अभिनयाने जिंकली आहेत. श्रेयस कायमच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. आपल्या जीवनातील सुंदर क्षण तो फॅन्ससह शेअर करत असतो. नुकतंच त्याने सोशल मीडियावर लेकीसोबतचा फोटो शेअर केला. निमित्त होतं डॉटर्स डेचं. या फोटोत श्रेयस, त्याची पत्नी दीप्ती आणि गोड तितकीच निरागस लेक आद्या पाहायला मिळत आहे. यांत श्रेयसचे आपल्या लेकीवर असलेले जीवापाड प्रेम पाहायला मिळत आहे. लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये श्रेयसमध्ये दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबा पाहायला मिळत आहे.
पहिल्यांदाच श्रेयसने त्याच्या लेकीचे इतके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बापाचे लेकीवरील हे प्रेम पाहून फॅन्सही भारावले असून त्यांच्याकडून या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. श्रेयस आणि दीप्ती यांच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून मे महिन्यात दीप्तीचे आगमन झालं होतं. श्रेयस आणि दीप्ती हे १३ वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकले होते. मे महिन्याच्या अखेरीस हे दोघेही फिरायला निघाले होते. विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या मुलीला सरोगसीच्या मदतीने जन्म देणार्या मातेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे हॉलिडे प्लॅन रद्द करून ते परतले. दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.
श्रेयस तळपदे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो आगामी सिनेमात बंगाली लेखकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'भैयाजी सुपरहिट'. या चित्रपटातील भूमिकेसाठी श्रेयसने बंगाली भाषेचे धडे देखील गिरवले आहेत.
श्रेयसने 'भैयाजी सुपरहिट' चित्रपटासाठी बंगाली भाषेचे प्रशिक्षण त्याची जवळची मैत्रीण व अभिनेत्री सेलिना जेटलीकडून घेतले आहेत. या दोघांनी एकत्र २००९ साली पेइंग गेस्ट सिनेमात काम केले होते. दोघांच्या मैत्रीबद्दल श्रेयस म्हणाला की, ''गोलमाल रिटर्न्स' व 'पेइंग गेस्ट' चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर आम्ही चांगले मित्र झालो. माझी बायको दीप्ती व सेलिना ह्या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. त्या दोघी एकत्र शॉपिंगलाही जातात. तसेच आम्ही एकमेकांच्या घरीदेखील जातो. जेव्हा मला कळले की सेलिना खूप चांगले बंगाली बोलते. तेव्हा मी आश्चर्यचकीत झालो आणि तिच्याकडूनच बंगाली शिकायचे ठरवले. सेलिना पहिली व्यक्ती आहे जिच्याकडून मी माझ्या भूमिकेसाठी भाषेचे धडे गिरवले आहेत. तिने मला बंगाली भाषेतील बारकावे शिकवली. या भूमिकेसाठी तिने मार्गदर्शन केले, असे श्रेयसने सांगितले.