Join us

Asha Parekh Dadasaheb Phalke Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2022 6:42 PM

आशा पारेख यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

Asha Parekh Dadasaheb Phalke Award: ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. यंदाच्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले होते. तो पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. आशा भोसले, हेमा मालिनी, पूनम धिल्लन, उदित नारायण आणि टी. एस. नागभरण यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने या सन्मानासाठी पारेख यांच्या नावाची निवड केली.

१९५९ ते १९७३ या काळात आशा पारेख बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांनी वयाच्या १० व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 'दिल देके देखो', 'कटी पतंग', 'तिसरी मंझिल', 'बहारों के सपने', 'प्यार का मौसम' आणि 'कारवाँ' सह ९५ हून अधिक चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनेत्री आशा पारेख यांनी ‘माँ’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आशा पारेख भारतीय सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. आशा पारेख यांचा मुख्य अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट ‘दिल दे के देखो’ होता. हा चित्रपट यशस्वी झाला. सुमारे ८० चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून काम केलेल्या आशा पारेख यांचे सर्व चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले. ज्यात ‘जब प्यार किसी से होता है’, ‘घराना’, ‘भरोसा’, ‘मेरे सनम’, ‘तीसरी मंजिल’, ‘दो बदन’, ‘उपकार’, ‘शिकार’, ‘साजन’, ‘आन मिलो सजना’ हे काही विशेष गाजलेले चित्रपट आहेत.

टॅग्स :आशा पारेखद्रौपदी मुर्मू