अभिनेता सनी देओलनंतर आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायकाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रसिद्ध गायक- संगीतकार दलेर मेहंदी यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून याची अधिकृत घोषणा पक्षाकडून करण्यात आली आहे. पश्चिम दिल्लीचे भाजपचे उमेदवार हंसराज आणि केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत मेहंदी यांनी पक्षप्रवेश केला. त्यांच्यावर कोणत्या मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली याबद्दल अद्यापतरी भाजपाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये.
पण त्यांचे व्याही हंसराज हंस हे दिल्लीमधून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे दलेर मेहंदी निवडणूक न लढवता त्यांच्या व्याहींचा प्रचार करतील असे म्हटले जात आहे. दलेर यांची मुलगी अजित कौर मेहेंदीचा विवाह हंसराज हंस यांचा मुलगा नवराज हंससोबत झाला आहे. हंसराज हंस हे देखील प्रसिद्ध पंजाबी गायक आहेत.
दलेर मेहंदी यांना त्यांच्या गाण्यांमुळे चांगलीच लोकप्रियता आहे. पंजाबमध्ये तर त्यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. बोलो ता रा रा, तुनक तुनक तुन, हो जायेगी बल्ले बल्ले यांसारखी त्यांची अनेक गाणी प्रचंड हिट आहेत. दलेर मेहंदी यांचा भाऊदेखील गायनक्षेत्रात प्रसिद्ध असून त्याचे नाव मिका सिंग आहे.
दलेर मेहंदी हे काही वर्षांपूर्वी चांगलेच वादात अडकले होते. मानवी तस्करीच्या आरोपाखाली मेहेंदी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. पटियालामधील बक्षिस सिंग यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. कॅनडात अनधिकृतरित्या स्थायिक होण्यासाठी दलेर आणि त्यांच्या भावांनी मदत करण्याचे कबूल केले होते आणि त्यासाठी त्यांच्याकडून पैसे देखील घेतले होते असे बक्षिस यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले होते. एवढेच नव्हे तर 1998 आणि 1999 ला एका कार्यक्रमासाठी मेहेंदी भावंडं दहा लोकांना अनधिकृतरित्या अमेरिकेला घेऊन गेले होते आणि तिथे स्थायिक व्हायला त्यांना मदत केली होती असे देखील त्यांनी म्हटले होते. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील दलेर मेहंदी यांच्या ऑफिसमध्ये धाड टाकून मेहेंदी भावंडांना या कामासाठी जे पैसे देण्यात आले होते, त्याबाबतच्या फाईल्स जप्त केल्या होत्या.