टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर (Dalljiet Kaur) दुसऱ्या घटस्फोटामुळे सध्या चर्चेत आहे. केनियाचा बिझनेसमन निखिल पटेलसोबत तिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर १० महिन्यातच निखिलाचे विवाहबाह्य संबंध असल्याचं समोर आलं. दलजीतला दुसऱ्या लग्नातही धोका पत्करावा लागल्याने ती पूर्णपणे कोसळली. सोशल मीडियावर तिने निखिल पटेलची पोलखोल केली मात्र त्याने उलट तिच्याविरोधात केस केली. दलजीतने नुकतंच स्टोरी शेअर करत तिच्या एकूणच मानसिक स्थितीविषयी सांगितले.
दलजीत कौर काही दिवसांपूर्वीच केनियाला गेली होती. तिने तिथून आपलं सगळं सामान आणलं. निखिल पटेलचंही हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुली आहेत. दोन मुलींचा पिता आहे म्हणजे त्याला मुलीचं मन कळत असेल तो धोका देणार नाही असं दलजीतला वाटलं होतं. मात्र तिचा मोठा विश्वासघात झाला. यातून ती सावरण्याचा प्रयत्न करत आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत दलजीत लिहिते, "जे लोक मला मेसेज करुन यातून सावरण्यास सांगत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की याला वेळ लागेल. माफ करा, पण मी त्याच्यासारखी नाही. मी माझा वेळ घेईन. माझ्या या कठीण परिस्थितीत तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात म्हणून मी तुमची आभारी आहे. आणि हो माझी कहाणी अजून लिहिली जात आहे. माझ्या कहाणीचा पुढचा चॅप्टर ड्राफ्टमध्ये आहे."
दलजीत कौरने २००९ साली पहिलं लग्न शालीन भनोटशी केलं होतं. त्यांना एक मुलगाही झाला. २०१५ मध्ये त्यांना घटस्फोट झाला. शालीन भनोटवर तिने कौटुंबिक छळाचे आरोप लावले होते. यानंतर गेल्याच वर्षी दलजीतने निखिल पटेलशी लग्न केले होते.