‘दंगल’ हा आमिर खानसारख्या सुपरस्टारसोबत पहिलाच चित्रपट आणि या पहिल्याच चित्रपटाने मिळवून दिलेली लोकप्रियता...असा सगळा झायरा वसीमचा प्रवास सुुरू होता. केवळ पाच वर्षांच्या करिअरमध्ये झायराने बॉलिवूडमध्ये मोठा पल्ला गाठला होता. पण आज अचानक झायराने बॉलिवूडमधून एक्झिट घेण्याचा निर्णय घेत, चाहत्यांना मोठा धक्का दिला.फार कमी वयात झायराने अनेक पुरस्कार जिंकले.२०१६ साली या सिनेमासाठी झायराला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या चित्रपटानंतर पुढच्याच वर्षी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा झळकली होती. या सिनेमासाठीही तिला फिल्मफेअरचा बेस्ट अॅक्ट्रेस क्रिटिक्स हा पुरस्कार मिळाला होता. सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह होती.
झायराचा ‘स्काय इज पिंक’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. त्याआधीच तिने बॉलिवूडमधून संन्यास घेत असल्याचे जाहिर केले. या चित्रपटात ती मोटिवेशन स्पीकर आयशा चौधरीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यात फरहान अख्तर व प्रियंका चोप्रा लीड भूमिकेत आहेत.
मुस्लिम कट्टरपंथीयांचा विरोधझायरा तिच्या पहिल्या चित्रपटापासूनच मुस्लिम कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर आली होती. ‘दंगल’साठी तिने आपले केस कापले होते. जे इस्लामच्या विरूद्ध असल्याचे म्हटले गेले होते. यानंतर झायरा वसीमच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली गेली होती. झायराने जम्मू काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांची भेट घेतली तेव्हाही फुटीरवाद्यांकडून तिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या धमक्यानंतर झायराने सोशल मीडियावर माफी मागितली होती. पण ३ तासांनंतर हा माफीनामा डिलीटही केला होता.
विमानात झाले होते असभ्य वर्तनझायरा वसीमने आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. झायरा वसीम 9 डिसेंबरला दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘1 एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘2 एफ’ वर 45 वर्षांचा एक इसम बसलेला होता.
नऊ वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराच्या मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली. मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहितीझायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नव्हते. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.