Join us

डॅनी डेन्झोपासोबत ब्रेकअप झाल्यानंतरही त्याच्या बेडरूममध्येच बसलेली असायची परवीन बाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 5:23 PM

डॅनी आणि परवीन यांचे ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री किमसोबत त्यांचे अफेअर होते. ते किमला अनेकवेळा घरी घेऊन यायचे. तर घरी परवीन आधीपासूनच बेडरूममध्ये बसलेली असायची.

ठळक मुद्देया मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले होते की, आम्ही दोघे अनेक वर्षं जुहूमधील एकाच सोसायटीत राहात होतो. आम्ही वेगळे झाल्यानंतरही अनेकवेळा ती मला जेवायला घरी बोलवायची.

डॅनी डेन्झोपाचा आज वाढदिवस असून त्यांनी एक खलनायक म्हणून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म हा सिक्कीममधील असून त्यांचे शित्रण नैनितालमध्ये झाले आहे. त्यांना भारतीय सैन्यात भर्ती व्हायचे होते. त्यांचे त्यासाठी प्रयत्न देखील सुरू होते. पण अचानक त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि ते अभिनयक्षेत्राकडे वळले.

डॅनी यांच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. परवीन बाबी आणि डॅनी यांचे अफेअर तर त्याकाळात चांगलेच गाजले होते. डॅनी आणि त्यांच्या नात्याविषयी तर डॅनी यांनीच एका मुलाखतीत सांगितले होते. डॅनी आणि परवीन बाबी यांच्या नात्याबद्दल डॅनी यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. परवीन या खूप चांगल्या अभिनेत्री असण्यासोबतच खूप चांगल्या व्यक्ती होत्या असे देखील डॅनीने या मुलाखतीत कबूल केले होते.

डॅनी यांनी या मुलाखतीत सांगितले होते की, मी आणि परवीन एकमेकांच्या आयुष्यात आलो, त्यावेळी खूपच तरुण होतो. जवळजवळ चार वर्षं आम्ही एकत्र राहिलो. त्याकाळासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आम्ही एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवला. पण काही वर्षांनंतर आम्ही वेगळे व्हायचे ठरवले. पण त्यानंतरही आम्ही खूप चांगले फ्रेंड्स होतो. त्यानंतर परवीनच्या आयुष्यात कबीर (कबीर बेदी) आला. कबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्षं ती महेश भट्टसोबत नात्यात होती.

या मुलाखतीत त्यांनी पुढे सांगितले होते की, आम्ही दोघे अनेक वर्षं जुहूमधील एकाच सोसायटीत राहात होतो. आम्ही वेगळे झाल्यानंतरही अनेकवेळा ती मला जेवायला घरी बोलवायची. त्यावेळी मी अभिनेत्री किमसोबत नात्यात होतो. पण याची पर्वा परवीनला नव्हती. ती कोणत्याही वेळी माझ्या घरी यायची. किमसाठी हे सगळे समजणे खूपच अवघड होते. काही वेळा तर किमचे चित्रीकरण आटपल्यानंतर मी तिला चित्रपटाच्या सेटवरून माझ्या घरी घेऊन यायचो तर माझ्या घरात परवीन असायची. ती चक्क बेडरूममध्ये बसून व्हीसीआरवर चित्रपट पाहात राहायची. तिचे हे वागणे मला आणि किमला विचित्र वाटायचे. पण त्यावर आपण केवळ फ्रेंड्स आहोत... आपल्यात तसे काहीही नाहीये असे म्हणते ती जोराजोरात हसायची.

डॅनी डेन्झोपा यांचे खरे नाव भलेमोठे असून उच्चार करण्यासाठी देखील ते खूपच कठीण आहे. Tshering Phintso Denzongpa (शेरिंग फिंटसो डेन्झोपा) असे त्यांचे नाव असून चित्रपटसृष्टीत येण्याआधी त्यांनी त्यांचे नाव बदलून डॅनी असे ठेवले.

डॅनी यांनी जरूरत या चित्रपटाद्वारे त्यांच्या करियरला सुरुवात केली. पण मेरे अपने या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. धुंद या चित्रपटाद्वारे ते खलनायकाच्या भूमिकेकडे वळले. त्यांनी चोर मचाये शोर, फकिरा, देवता, काला सोना, अग्निपथ, हम, सनम बेवफा, क्रांतीवीर, विजयपथ, खुदा गवाह, बरसात, घातक यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. त्यांना आजवर त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी फिर वही रात, राम यांसरख्या चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी काला सोना, नया दौर यांसारख्या चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली आहे.

टॅग्स :डॅनी डेन्झोपापरवीन बाबी