Join us  

गडद वाटेवरचा अनाकलनीय शोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2016 3:01 AM

जाणिवांचे आक्रंदन अशा पठडीतले कोणतेही लेबल ज्याला चपखल लागू पडेल असा चित्रपट म्हणजे कौल, असा साधारण अर्थ या चित्रपटातून काढता येतो.

-राज चिंचणकरमनाची अथांगता, गूढत्व, आंतरिक द्वंद्व, अद्भुतता, अंतर्मनाचे खेळ, जाणिवांचे आक्रंदन अशा पठडीतले कोणतेही लेबल ज्याला चपखल लागू पडेल असा चित्रपट म्हणजे कौल, असा साधारण अर्थ या चित्रपटातून काढता येतो. हेही नाही आणि तेही नाही अशा मार्गाला अनुसरून, अर्थात नेती मार्गावरून या चित्रपटाचे मार्गक्रमण होते. सातत्याने गडद वाटेवर पावले टाकत अगम्यतेचा अनाकलनीय शोध घेणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाला सरळ अशी गोष्ट नाही आणि त्यात गोष्ट शोधण्यासाठी वावही नाही. कारण हा केवळ एक चित्रपट नाही; तर ती अखंड अशी चित्रभाषा आहे. सर्वसाधारण चित्रपटांच्या मांदियाळीपासून कोसो दूर अशी या चित्रपटाची जातकुळी आहे. त्यामुळे नेहमीच्या; विशेषत: मनोरंजनाच्या नजरेपलीकडचा चष्मा लावून या चित्रपटाचा अनुभव घेणे क्रमप्राप्त आहे. चित्रपट ही सर्वसाधारणपणे पाहण्याची गोष्ट असली, तरी कौल हा चित्रपट ऐकण्याची गरज अधिक आहे. यात केवळ संवाद बोलत नाहीत; तर ध्वनी अधिक बोलतात. त्यामुळे हा चित्रपट ऐकणे ही या चित्रपटाला समजून घेण्याची परिभाषा आहे.कुठल्याही फूटपट्टीचे मोजमाप या गोष्टीला लावता येणार नाही. तसे म्हटले तर या चित्रपटाला एक नायक आहे; पण रूढार्थाने नव्हे. त्याच्याकडून हत्या झालेली आहे आणि आता तो कोकणात आला आहे. तिथे त्याला भेटलेला एक म्हातारा त्याला नेती मार्गाची ओळख करून देतो. विश्वाची उत्पत्ती वगैरे अशा गहन प्रश्नापासून मातीतल्या जीवजंतूंपर्यंतचा शोध घेण्याच्या प्रयत्नात, विश्वाचा नाश होणारी घंटा वगैरे वस्तूंची भर पडते आणि रूपकात्मकतेचा ध्यास घेत हा चित्रपट वळणावळणाने पुढे सरकत राहतो.भावनिक जग आणि व्यावहारिकता यातला पडदा दूर करण्याचा नव्हे; तर त्या पडद्याआडून पलीकडचे जग न्याहाळण्याचा प्रयत्न कथा, पटकथा, संवादलेखक व दिग्दर्शक आदिश केळुसकर याने या चित्रपटात केलेला दिसतो. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासूनच हे काहीतरी वेगळे आहे याची जाणीव होत जाते. मध्यांतरापर्यंतचा वेळ पडद्यावर जे काही चालले आहे, त्याचा संदर्भ लावण्यातच जातो. अतिशय हळुवारपणे दृश्ये पुढे सरकत राहतात आणि नक्की चालले आहे काय, असा प्रश्न मनात घोळायला लागतो. पण उत्तरार्धात, चित्रपटातला म्हातारा त्याच्या संवादांतून समजत जातो आणि चित्रपटाचा सारांश आवाक्यात येऊ लागतो.एकमेकांशी अजिबात संबंध नसलेल्या फ्रेम्सचा भडिमार होताना आणि तोही अतिशय संथ गतीने होतानाचा अनुभव घेण्यासाठी प्रचंड संयमाची गरज आहे. यातली बधिरता मस्तक सुन्नही करून टाकेल. रूढार्थाने चित्रपटात नायक, नायिका वगैरे नाही. तरीपण यात नायक म्हणून अस्तित्व दाखवणारा रोहित कोकाटे आणि म्हातारा रंगवणारे दीपक परब यांनी त्यांच्या भूमिका नीट बजावल्या आहेत. मुळात यात अभिनयाला वाव नाही तर ध्वनी हेच यातले मूळ अभिनय माध्यम आहे. त्यानुसार ऋत्विक राज पाठक व सिद्धार्थ दुबे यांनी योग्य ध्वनी संयोजन केले आहे. छायांकन हीसुद्धा यातली व्यक्तिरेखा ठरू पाहते आणि अमेय चव्हाण यांनी तिची गरज नीट ओळखली आहे.करमणूक म्हणून या चित्रपटाकडे अजिबात पाहता येणार नाही. किंबहुना, सरळसरळ आर्टफिल्म या पठडीतच हा चित्रपट मोडतो. त्यामुळे नेहमीची चित्रपट अनुभवण्याची सवय बाजूला ठेवूनच हा कौल मानावा लागतो. साहजिकच, सर्वसामान्यपणाच्या पलीकडे उडी घेणारा हा चित्रपट पाहण्यासाठी धाडसच करावे लागेल. फेस्टिव्हलचे चित्रपट पाहण्याची सवय असलेल्यांना मात्र ही चित्रभाषा त्याच्या प्रेमात पडायला लावेल. त्यांना नवा अभ्यास करायलाही हा चित्रपट नक्कीच कौल देईल. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीकोनातून पाहता, काहीच कळले नाही असे म्हणत चिडचिड होण्यापासून; यात बरेच काही आहे असा शोध लागण्यापर्यंतचा आवाका या चित्रपटाचा आहे. कुठल्या चष्म्यातून हा चित्रपट पाहिला जाईल; यावर त्याचे समजणे अवलंबून आहे. त्यामुळे छान आणि वाईट अशा परस्परविरोधी भावना या चित्रपटाच्या अनुभवण्यातून निर्माण होऊ शकतात. साहजिकच, ज्याने त्याने स्वत:च्या जबाबदारीवर हा कौल स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही.