ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - मुंबईच्या अंडरवर्ल्डला रंगीत पडद्यावर आणण्यासाठी मशहूर असलेला राम गोपाल वर्मा आपला पुढचा सिनेमा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या वैमनस्यावर आधारीत बनवत आहे. स्वत: रामूनेच ट्विटरच्या माध्यमातून आज ही बातमी दिली असून चक्क गुगल डॉक्समध्ये सविस्तर माहितीच शेअर केली आहे.
गव्हर्नमेंट असं नाव असलेल्या या सिनेमामध्ये दाऊद व राजन वेगळे झाल्यानंतरच्या अंडरवर्ल्डचं चित्रण असेल. रामू सांगतो, दोघं एकत्र होते, तो पर्यंत मुंबई शांत होती, परंतु दोघे वेगळे जाल्यानंतर, काँट्रॅक्ट किलिंग वाढलं, अनेक छोट्या मोठ्या गँग्ज उदयाला आल्या आणि खंडणीचं नवं पर्व सुरू झालं. दाऊदने दहशतवादी नी आएएसआयशीही दोस्ती केली आणि अखेर सरकारनं राजनला हाताशी धरलं.
दाऊद व छोटा राजनखेरीज या चित्रपटामध्ये अनीस इब्राहीम, छोटा राजनची पत्नी सुजाता, मोलिका बेदी, अबू सालेम, मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे आणि अरूण गवळी यांच्याही व्यक्तिरेखा असणार आहेत.
याआधी सत्या, कंपनीसारखे अंडरवर्ल्डवरचे सिनेमे रामगोपाल वर्माने बनवले आहेत. परंतु हा नवा चित्रपट गव्हर्नमेंट सत्यकथेच्या जास्त जवळ असेल असा दावा रामूने केला आहे. गुन्हेगारी संघटना आणि सरकारी संस्था यांच्यातल्या संबंधावरही या चित्रपटात भाष्य असेल असं सांगताना छोटा राजनच्या अटकेतून या सगळ्या बाबी समोर आल्याचं रामूनं म्हटलं आहे.