CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. सीआयडी मालिकेसोबतच त्याच्यातील कलाकारांनीही फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. या मालिकेतील दया म्हणजेच दयानंद शेट्टी, अभिजीतच्या भूमिकेत असलेला आदित्य श्रीवास्तव, फ्रॅडीची भूमिका साकारणारा दिनेश फडणीस तसेच पूर्वी म्हणजेच अंशा सय्यद या कलाकारांना मुख्य भूमिकेत घेऊन एका निर्मात्याने सीआयएफ ही मालिका बनवली असून या मालिकेची संकल्पना देखील काहीशी सीआयडी सारखीच आहे. दंगल या वाहिनीवर सप्टेंबर 2019 पासून ही मालिका सुरू झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या मालिकेला मिळत आहे.
सीआयएफ या मालिकेचे प्रमोशन देखील खूप चांगल्याप्रकारे करण्यात आले होते. पण आता स्पॉटबॉयने दिलेल्या बातमीनुसार, दया, आदित्य, दिनेश आणि अंशा हे या मालिकेसाठी गेल्या सहा-सात महिन्यांपासून काम करत असले तरी या मालिकेसाठी त्यांना कोणतेही मानधन अद्याप मिळालेले नाही. त्यांनी आता सिंटामध्ये जाऊन व्हाईट सँड प्रोडक्शनच्या विरोधात केस दाखल केली आहे.
CID ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. जवळपास 21 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 27 ऑक्टोबर 2018 ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. CID या मालिकेचा लिम्का बुक रेकॉर्डमध्येही समावेश झाला होता.
ही मालिका आजवर सगळ्यात जास्त वर्षं टिव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका आहे. या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव, दिनेश फडणीस, नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुसळे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतील कुछ तो गडबड है, दया तोड दो दरवाजा हा संवाद प्रचंड गाजला होता.