शाहरुख खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला आदित्य चोप्रा दिग्दर्शित दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे (डीडीएलजे) या सिनेमाला आज 25 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने रोमान्सचा किंग सांगतोय की त्याला कधीच वाटले नव्हते तो पडद्यावर रोमँटिक भूमिका चांगली करू शकेल.
शाहरूख खान म्हणाला की, मी त्याआधी जे काम केले होते राज त्याहून वेगळा होता. डीडीएलजेच्या आधी डर, बाजीगर, अंजाम या सिनेमात मी नकारात्मक भूमिका केल्या होत्या. शिवाय, मला वाटायचे मी रोमँटिक प्रकारच्या भूमिका करण्यासाठी योग्य नाही. त्यामुळे आदि आणि यशजींनी ही भूमिका करण्याची संधी दिली तेव्हा मला फारच छान वाटले होते पण हे मी कसे करू शकेन, याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. मी हे नीट करू शकेन का, हे ही मला माहीत नव्हते.
शाहरूखने सांगितले की तो महिलांच्या बाबतीत काहीसा लाजाळू होता आणि त्यामुळे डीडीएलजेमधील रोमँटिक सीन कसे करावे याबद्दल काहीसा साशंक होता. "मला अनेकांनी सांगितलं की मी फार वेगळा दिसलोय... नायकाची जी काही प्रतिमा होती त्याहून निराळा. मलाही असं वाटलं की कदाचित मी फारसा हँडसम नाही किंवा ते म्हणतात ना 'चॉकलेटी' वगैरे नाही त्यामुळे मी रोमँटिक भूमिकांसाठी साजेसा नाही. शिवाय, महिलांच्या बाबतीत मी जरासा लाजाळूच होतो. त्यामुळे प्रेमाचे, रोमँटिक डायलॉग्स कसे म्हणेन, हे कळत नव्हतं."
चाहते एसआरकेला प्रेमाने किंग खान म्हणतात. एसआरके पुढे म्हणाला, "मी हे मान्य करायला हवं की असे छान छान रोमँटिक सिनेमे फारसे न आवडणाऱ्या मला काजोल आणि माझ्यातल्या काही दृश्यांनी बदलून टाकले, मला ते छान वाटू लागले. अगदी खरं सांगतो." तो पुढे म्हणाला, "डीडीएलजेची गाणी लागली की मी रेडिओचं चॅनल बदलत नाही. मला त्यांचा कधीच कंटाळा येत नाही. माझा सगळा मार्ग ज्या अविस्मरणीय पद्धतीने बदलला गेला त्या सिनेमाच्या आठवणी त्या निमित्ताने पुन्हा जागृत होतात."डीडीएलजेच्या लोकप्रिय शेवटाने कित्येक पिढ्यांना आपली प्रेमकहाणी राज आणि सिमरनसारखी असावी असे वाटायला लावले. अनेक फिल्ममेकर्सनी हे दृश्य त्यांच्या सिनेमाची प्रेरणा म्हणून वापरले आहे. एसआरके म्हणतो की ट्रेनमधले हे दृश्य इतके लोकप्रिय होईल असे त्याला चित्रीकरणाच्या वेळी वाटलेच नव्हते. याचा काही वेगळा शेवट नसूच शकला असता. पण, हा शेवट इतका लोकप्रिय होईल, असे मला वाटले नव्हते," तो म्हणाला.आपल्याला सुपरस्टारडमपर्यंत पोहोचवण्याचे श्रेय एसआरके डीडीएलजेला देतो. तो म्हणतो, "मला वाटते डीडीएलजेने मला माझे स्थान निर्माण करण्यात, ते बळकट करण्यात मदत केली आणि मी कल्पनाही केली नव्हती अशा पद्धतीने मला यश, प्रसिद्धी दिली. आपण त्या क्षणात जगत असतो, सिनेमा शक्य तितका चांगला करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या सिनेमाच्या यशामध्ये अनेक गोष्टींचा सहभाग आहे. हा सिनेमा जितका लोकप्रिय झाला त्यामागचं एक कारण सांगता येणार नाही. मला वाटतं या यशाचं श्रेय आपण हा सिनेमा ज्या प्रेमाने, मनापासून बनवला गेला त्या प्रेमाला दिलं पाहिजे... आदि, यशजी आणि संपूर्ण कास्ट आणि क्रू सगळ्यांचं श्रेय आहे आणि माझ्यामध्ये नसलेल्या 'गूड लुक्सचेही'."View this post on InstagramA post shared by Yash Raj Films (@yrf) on
तो म्हणतो, "मला नेहमी असे वाटायचे की माझ्या लुक्समुळे मी नेहमी वेगळ्या धाटणीच्याच भूमिका करू शकेन. पण, डीडीएलजेने बदललं आणि मी अजूनही प्रयत्न करतोय की तो मॅचो, सगळ्यांपेक्षा वेगळा, वाईट प्रवृत्तीचा माणूस अशी भूमिका मला मिळेल जी माझ्यावर साजेशी असेल किंवा मला वाटते गेली २५ वर्षे मी प्रयत्न करतो मला रोमँटिक, गोडगोड न समजल्या जाण्याचा... पण हा प्रयत्न आहे आणि मला आनंद आहे की त्यात मला यश आलेले नाही."