- चित्राली चोगले अणावकर
Stars- 3
'दे धक्का'चं धमाल करणारं जाधव कुटुंब आठवत असेलच. तेच कुटुंब तब्बल १४ वर्षांनी पुन्हा धक्का देण्यासाठी आलंय, तेही 'दे धक्का २' सिनेमातून. कथा तिथेच सुरु होते जिथे, आधीची संपली होती. मकरंद जाधवने (मकरंद अनासपुरे) बनवलेला पार्ट आणि त्याची ख्याती तर ठाऊक आहेच ना आपल्याला. तोच पार्ट आणि त्याच्यामुळे घडलेला सगळा ड्रामा सुद्धा लक्षात असेलच. याच पार्टमुळे पुन्हा एकदा ड्रामा घडतो, त्याची सुरुवात होते ते या पार्टच्या ख्यातीमुळे. मकरंद यांच्या या पार्टबद्दल माहिती थेट लंडनपर्यंत पोहोचते. आणि तिथून बोलावणं येतं मकरंद यांच्या सत्काराचं. आता हे संपूर्ण कुटुंब लंडनला पोहोचणार आणि तिथे सगळं सुरळीत पार पडणार, असं कसं होईल बरं?
तर पुन्हा एकदा याच पार्टमुळे हा सगळा ड्रामा घडतो. आता तो कसा आणि त्यातून नेमकी कशी धमाल घडते? त्यासाठी सिनेमा पाहावा लागणार आहे. आता तो पाहायचा का? हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर अगदी थोडक्यात सांगायचं तर हो. सिनेमा नक्कीच पाहू शकता. त्यातील धमाल, पात्रांची केमिस्ट्री, होणारे विनोद आणि ऐकून अनुभव रंजक आहे, हे निश्चित. कलाकारांच्या अभिनयाने त्यात अजून जीव ओतलाय. तब्बल १४ वर्ष उलटून गेली तरी प्रत्येकाने आपली भूमिका इतकी चोख बजावली आहे की ही तीच माणसं आहेत, हे मनात ठाम होतं. अभिनयाची बाजू सिनेमाची एकदम पक्की आहे. कथेत जरा नाविण्य हवं होतं असं वाटतं खरं. कारण पुन्हा तोच पार्ट मग पुन्हा तिच धक्का मारत चालणारी गाडी, तीही लंडनमध्ये. शिवाय काही प्रसंग ओढून ताणून केले आहेत का असं वाटतं. असं असताना सुद्धा सिनेमातील घडणारी धमाल हा सगळा विचार मागे टाकते आणि आपलं पुरेपूर मनोरंजन होतं हे ही तितकंच खरं.
('दे धक्का 2'चं तिकीट बुक करण्यासाठी क्लिक करा)
सिद्धार्थ जाधवची भूमिका यावेळी अधिक धमाल तर करतेच, पण त्याच्या जोडीला असलेल्या हेमल्यामुळे ती धमाल डबल होते. तर या सिनेमात महेश मांजरेकर यांची भूमिका सिनेमात एक वेगळीच गंमत आणते. गौरी इंगवले हिने तिच्या भूमिकेला न्याय द्यायचा पुरेपूर प्रयत्न नक्कीच केलाय. तर शिवाजी साटम यांना पुन्हा एकदा त्याच जोमात पहायला खूप मज्जा येते. आणि हो त्यांची एक लव्हस्टोरी आहे बरं सिनेमात ती सुद्धा थेट लंडनच्या क्वीनसोबत. ती कशी ते सिनेमात पाहा. अगदी थोडक्यात सांगायचं तर सिनेमा मनोरंजक आहे आणि तितकाच धमाल आहे. काही गोष्टींचा फार विचार नाही. केला तर मज्जा अधिक येईल. कुटुंबासोबत या धमाल MAD RIDE चा अनुभव नक्की घ्या.