संजीव वेलणकर
पुणे, दि. १० - विख्यात गायक, गझलसम्राट जगजित सिंह यांची आज ( १० ऑक्टोबर) पुण्यतिथी.
८ फेब्रुवारी १९४१ रोजी त्यांचा जन्म झाला. जगजीत सिंह यांच्या वडिलांनी त्यांचे गायनातील गुण हेरून त्यांना पं. छगनलाल शर्मा यांच्याकडे पाठविले. त्यांच्याकडे गायनाचे प्राथमिक धडे घेतल्यानंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडे सहा वर्षे खयाल, ठुमरी आणि द्रुपद हे गायनप्रकार पक्के करून घेतले. त्यांनी केवळ गझल गायनाबरोबरच शास्त्रीय संगीत, भक्तीसंगीत आणि लोकसंगीतातही मौलिक योगदान दिले आहे. १९७० मध्ये चित्रा यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यावर ७० ते ८० च्या दशकात या दांपत्याने गझलविश्वाबत प्रचंड प्रसिद्धी मिळविली होती. या दशकात या दांपत्याच्या गझला घराघरात पोहोचल्या होत्या. हृदयाला भिडणार्याो गझला ही त्यांची खाशियत होती. त्यांच्या पत्नी चित्रा सिंग या सुद्धा प्रसिद्ध गझल गायक होत्या. त्यांनी पत्नी चित्रा सिंग हिच्यासह मैफिली सादर करून गझल रसिकांच्या हृदयात जागा मिळविली होती. १९७६ मध्ये त्यांचा पहिला अल्बम ‘अनफरगेटेबल’ प्रकाशित झाला. त्यानंतर आजतागायत त्यांच्या नावावर ‘आईना’, ‘चिराग’, ‘कहकशॉं’ असे जवळपास ८० अल्बम आहेत. मेहंदी हसन, नूर जहॉं, बेगम अख्तर आणि तलत महमूद या गझलांच्या चमचमत्या दुनियेत ‘पत्ता पत्ता बुता बुता हाल हमारा जाने है’, ‘ओठोंसे छू लो तुम’ अशी अविस्मरणीय गझलांनी जगजीत सिंह यांनी आपले स्थान या क्षेत्रात बळकट केले. त्यानंतर ‘अर्थ’, ‘प्रेमगीत’, ‘सरफरोश’, ‘तरकीब’ अशा अनेक चित्रपटांनाही त्यांनी आवाज दिला होता. प्रसिद्ध कवी गुलजार यांच्या काव्यांना मिर्झा गालिब यांच्या ढंगात पेश करत अक्षरश: तेव्हाच्या पिढीला वेड लावले. गजल आणि शायरीचा जनक मिर्झा गालिब सर्वसामान्यांच्या घराघरात मनामनात पोहोचवला. दुसरा महत्त्वपूर्ण अल्बम म्हणजे ‘संवेदना’ माजी पंतप्रधान अटलजींच्या शब्दांना स्वरसाज. शब्दांनाही मंत्राचे सामर्थ्य बहाल करण्याची ताकद लाभलेले कवि अटलबिहारी वाजपेयी यांच्या लेखणीतून साकारलेल्या शब्दांना जगजित सिंग यांनी गेय रूप दिले. मुळात अटलजींच्या कविता गेय रूपात आणणे अवघड काम, पण ते जगजित सिंग यांनी लिलया पेलले. अटलजींचे शब्द, जगजित सिंग यांचा आवाज अमिताभ आणि गुलजार यांच्या दमदार प्रस्तावना अशा सुरेल संगमातून एक अजरामर काव्य रसिकांना अस्वादता आले. ‘क्या खोया क्या पाया’ हे त्यातील गीत रसिकांना खूपच भावले. त्यांनी केवळ उर्दू आणि हिंदी भाषांतच गझला गायिल्या नाहीत तर पंजाबी, बंगाली, गुजराती, सिंधी आणि नेपाळी भाषांतूनही गाणी गायिली आहेत. जगजित सिंह यांच्या मेरी जिंदगी किसी और की..., मेरा नाम का कोई और है..., होशवालों को खबर क्या... अशा गझल खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी सरफरोश, तरकीब या हिंदी चित्रपटांमध्ये गझल गायली होती. भारत सरकारने त्यांच्या या सांस्कृतिक योगदानाची दखल घेऊन २००३ मध्ये त्यांना पद्मभूषण किताबाने गौरवांकित केले होते.
१० ऑक्टोबर २०११ रोजी निधन झाले. आपल्या समुहाकडून मा.जगजित सिंह यांना आदरांजली.
संदर्भ : विकी पिडीया