बॉलिवूड कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेता आणि नाटककार मोहन महर्षी (mohan maharishi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याविषयी अभिनेता पंकज झा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद माहिती दिली.
मोहन महर्षी यांनी मंगळवारी सकाळी अखरेचा श्वास घेतला. मोहन महर्षी यांनी रंगमंचावर सहा दशकांपेक्षा जास्त काळ काम केलं होतं. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे हिंदी कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मोहन महर्षी यांनी १९५५ मध्ये ऑल इंडिया रेडिओमधून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. १९६५ मध्ये त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमा केला. त्यानंतर १९८३ ते १९८६ या कार्यकाळात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालक पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांना दिग्दर्शन क्षेत्रात १९९२ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला होता.
दरम्यान, त्यांची आइन्स्टाईन, राजा की रसोई, विद्यामा आणि सानप पेडी ही नाटकं गाजली. तसंच अंधयुग, राणी जिंदन (पंजाबी), ऑथेलो, मदर या चित्रपटांसाठी त्यांनी दिग्दर्शन केलं. याशिवाय त्यांनी श्याम बेनेगल यांच्या भारत एक खोजमध्येही काम केलं. यामध्ये त्यांनी मुस्लिम समाजसुधारक सर सय्यद अहमद खान यांची भूमिका साकारली होती.