मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure) यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाली. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे समोर आले होते. त्यावर देखील त्यांनी मात केली होती आणि कामालाही पुन्हा सुरूवात केली होती. मात्र परत त्यांची तब्येत बिघडल्यामुळे पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. दरम्यान आता मिलिंद गवळी (Milind Gawali) यांनी अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे.
मिलिंद गवळींनी अतुल परचुरेंसोबतचा स्त्री वेशातील फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, १४ ऑक्टोबर २०२४ ला अतुल परचुरे आपल्याला सोडून गेला, आज आहे १८ ऑक्टोबर २०२४. आज ५वा दिवस, काळ काय कोणासाठी थांबत नाही, पटापट पुढे सरकत असतो, प्रत्येक जण आपापल्या कामाला सुरुवात करतो, जवळची दोन-चार माणसं जी असतात ती कायमची तुटून जातात, त्या माणसाशिवाय कसं जगायचं हा खूप मोठा प्रश्न सतत त्रास देत असतो, अतुल आजारी पडल्यानंतर त्याच्या पत्नीने सोनियाने खूप मोठा लढा दिला, खूप लेवल्सवर ती लढत होती, आणि अगदी भक्कम सावलीसारखी अतुलच्या मागे उभी होती, अक्षरशः मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं.
त्यांनी पुढे लिहिले की, अतुल स्वतः खूप स्ट्राँग पर्सनॅलिटी होता, तो हुशार होता, त्याचे स्वतःचे ठाम विचार असायचे, स्वावलंबी होता, पण या आजारानंतर तो बिचारा डॉक्टरस आणि हॉस्पिटलच्या तावडीत असा सापडला की तो हतबल झाला, आणि माझ्या अनुभवावरून मला माहिती आहे की एकदा का तुम्ही हॉस्पिटलज च्या तावडीत सापडलात, की कितीही स्ट्राँग माणूस असला, तरी हॉस्पिटलमध्ये तो सुन्न होऊन जातो, वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांच्या एक्सपेरिमेंट्स नंतर सुद्धा अतुल त्यातून बाहेर आला होता, त्यानंतर आमचं जेव्हा बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्याचे भयानक अनुभव माझ्याबरोबर शेअर केले होते, अनेक प्रश्न तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये निर्माण होत असतात, असे आजार, मग डॉक्टर्स, मग हॉस्पिटलज, शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक प्रश्न.
असंख्य आनंदाचे क्षण दिलेले आहेत
पण अतुल खूप आशावादी होता, परत उभा राहणार, परत भरपूर काम करणार, "इतक्या वर्षात आपण एकत्र काम केलं नाही पण आता नक्की करूया", पुन्हा कुटुंबासाठी स्वप्न, लेक सखील साठी स्वप्न, नियतीच्या मनात काय असतं काहीच सांगता येत नाही. आपल्या हातात हे सगळं स्वीकार करण्यापलीकडे काहीच नसतं, अतुलच्या आईवर, सोनीयावर , लेक सखील वर, काय गुजरत असेल. याची कल्पना करता येणार नाही, अतुलची कमी कधीही भरून काढता येणार नाही, पण "अतुलनीय" ने असंख्य लोकांना असंख्य आनंदाचे क्षण दिलेले आहेत, भाग्यवान आहेत ते ज्यांच्या सानिध्यात अतुल आला होता, त्यांना त्याने खूप साऱ्या सुंदर आठवणींचे गिफ्ट दिल्या आहेत. अतुल चे विचार खूप छान असायचे, मिश्कील तर तो होताच. शरीराने जरी तो आपल्यात नसला तरी त्याचे विचार, त्याच्या आठवणी, आणि कलाकार म्हणून त्यांनी जे योगदान दिलं आहे ते कायम आपल्या सोबत राहणार आहे. परमेश्वराकडे प्रार्थना करतो की कुटुंबासाठी आणि समाजासाठी त्यांनी जी स्वप्न पाहिली ती पूर्ण होऊ देत, असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.