Join us

लवकरच दीपा-कार्तिक होणार एकत्र; सुखी संसारासाठी लेकीच लावून देणार आई-वडिलांचं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2022 11:55 AM

Rang maza wegla: गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहिलेले कार्तिक आणि दीपा यांच्यातील जवळीक वाढत आहे. इतकंच नाही तर आता यांच्या लेकी कार्तिकी आणि दीपिका या दोघांचं लग्न लावून देणार आहेत.

छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla). आतापर्यंत या मालिकेत अनेक ट्विस्ट आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस या मालिकेची रंगत वाढत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांपासून दूर राहिलेले कार्तिक आणि दीपा यांच्यातील जवळीक वाढत आहे. इतकंच नाही तर आता यांच्या लेकी कार्तिकी आणि दीपिका या दोघांचं लग्न लावून देणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कार्तिक-दीपाचा सुखी संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये कार्तिकी शेजारील काकूंचं बोलणं ऐकते. या दोन महिला एका स्त्रीच्या दुसऱ्या लग्नाविषयी बोलत असतात. त्यांचं ऐकून कार्तिकीदेखील दीपाकडे दुसरं लग्न करण्याचा हट्ट धरते. तर, दुसरीकडे दीपिकादेखील कार्तिकला दीपासोबत लग्न कर असा आग्रह करते. दीपा अंटीकडे पाहिलं की मला आई भेटल्यासारखं वाटतं, त्यामुळे तू दीपा अंटीसोबत लग्न कर असं दीपिका कार्तिकला सांगते.

दरम्यान, आता दोन्ही मुली आई-वडिलांकडे लग्नासाठी हट्ट करुन लागल्या आहेत. त्यामुळे येत्या भागात या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांचं पुन्हा लग्न पाहता येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, जुने सारं विसरुन दीपा-कार्तिक या लग्नाला तयार होतील का?  खरंच कार्तिकी-दीपिकाला त्यांचे खरे आई बाबा मिळतील का? अशा कितीतरी प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. मात्र, पुढील भागातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळणार आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकाररेश्मा शिंदेसेलिब्रिटी