90 चा काळ हा बॉलिवूडसाठी विशेष मानला जातो. कारण, या काळात अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती झाली. सोबतच अनेक दिग्गज कलाकारही इंडस्ट्रीला मिळाले. या काळात सलमान खान (salman khan), शाहरुख खान (shahrukh khan), आमिर खान (aamir khan), संजय दत्त (sanjay dutta) या कलाकारांची तुफान क्रेझ होती. किंबहुना आजही या कलाकारांची लोकप्रियता पाहायला मिळते. मात्र, या सगळ्यात एक अभिनेता असा होता जो सुपरस्टार होताहोता राहिला.इतकंच नाही तर त्याच्यामुळेच आज शाहरुख खानबॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो.
दिपक तिजोरी (Deepak Tijori) हे नाव सर्वपरिचित आहे. ९० च्या दशकात दिपकची लोकप्रियता हळूहळू वाढत होती. त्याच्या अभिनयाचं आणि पर्सनालिटीची सर्व स्तरांमध्ये चर्चा रंगत होती. मात्र, त्याच्या आयुष्यात एक काळ असा आला ज्यावेळी त्याची फसवणूक करण्यात आली. परिणामी, त्याच्या हातून सुपरहिट सिनेमा गेला. आणि, तो बॉलिवूड स्टार होताहोता राहिला. या फसवणुकीनंतर त्याच्या करिअरला उतरती कळला लागली. आणि तो, साईड अॅक्टर म्हणूनच इंडस्ट्रीत राहिला.
१९९३ साली प्रदर्शित झालेला बाजीगर हा सिनेमात तर साऱ्यांच्याच लक्षात आहे. या सिनेमात शाहरुख खानने मुख्य भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. या सिनेमानंतर शाहरुख बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु, शाहरुखपूर्वी या सिनेमाची ऑफर दिपकला मिळाली होती. मात्र, ऐनवेळी त्याला या सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
अलिकडेच दिपकने 'बॉलिवूड ठिकाना'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दिपकने याविषयी खुलासा केला होता. सोबतच 'बाजीगर'च्या वेळी माझ्यासोबत फसवणूक झाल्याचंही त्याने सांगितलं. "मी एक सिनेमा पाहिला होता. 'किस बिफोर डाइंग'. त्यानंतर मी या सिनेमाची कथा दिग्दर्शक अब्बास मस्तान यांना ऐकवली. त्यावेळी कॉपीराईट वगैरे याकडे फारसं लक्ष दिलं जायचं नाही. असंच तोंडी सगळे व्यवहार व्हायचे. त्यामुळे त्या काळात बरेचसे सिनेमा हॉलिवूडच्या सिनेमांवरुन केले जायचे. त्यावेळी मी अब्बास मस्तानला मी सांगितलं की या सिनेमात एक खलनायक असेल जी भूमिका मी साकारेन. आणि, बाकीच्या कलाकारांना तुम्ही कास्ट करा. त्यावर ते तयारही झाले. त्यानंतर खिलाडी हा सिनेमा रिलीज झाला, मग जो जीता वही सिकंदर हा सुद्धा आला. त्यामुळे डिस्ट्रीब्यूशनचे लोक माझ्याकडे मी लवकरच हिरो होईन या दृष्टीने पाहात होते", असं दिपक म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "त्यावेळी बाजीगरची निर्मिती करणारे पहलाज निहलानी यांची मी भेट घेतली सगळं काही फायनल झालं. पण एक दिवस अचानक त्यांचा फोन आला आणि अब्बास मस्तान या सिनेमासाठी वीनससोबत चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्या काळी मी आणि शाहरुख मित्र होतो. त्यामुळे वरचेवर पार्टी करण्यासाठी रात्री भेटायचो. तेव्हा तुला कोणी या सिनेमाची ऑफर दिलीये का?विचारलं. तर त्यावर त्याने हो असं सांगितलं. त्याच्या घरी त्या सिनेमाची व्हिसीडी सुद्धा पोहोचवली होती. यावेळी अब्बास मस्तानसोबत मी बोललो तर त्यांनी वीनसोबत चर्चा करताना शाहरुख मुख्य भूमिकेत असेल असं सांगितलं होतं. सोबतच जर आता ऐनवेळी कास्ट चेंज झाले तर त्याचा परिणाम सगळ्यांच्या करिअरवर होईल असं सांगितलं. त्यामुळे तुला दुसऱ्या सिनेमात मदत करेन असं म्हणत त्यांनी मला या सिनेमातून बाहेर केलं."
दरम्यान, दिपक तिजोरी याने बॉलिवूडमध्ये अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, त्याची ओळख फक्त सहाय्यक अभिनेता इथपर्यंतच मर्यादित राहिली. दिपक यांचा आता कलाविश्वातील वावर कमी झाला आहे. मात्र, सोशल मीडियावर ते कमालीचे सक्रीय आहेत.