सध्या मराठी सिनेसृष्टीत नवोदित चेहरे रुपेरी पडद्यावर झळकताना पाहायला मिळत आहे. आता आणखीन एक अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या नवोदीत अभिनेत्रीचे नाव आहे दिपाली सुखदेवे. ती प्रीती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित 'डिजेवाला दादा' या गाण्यातून मराठी इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. या गाण्याचे चित्रीकरण नुकतेच मालाड येथील 'आउट पोस्ट' बारमध्ये पार पडले. यानिमित्ताने आपल्याला तिचा एक धम्माल नृत्याविष्कार पाहायला मिळणार आहे.
सुप्रसिध्द गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनी 'डिजेवाला दादा' हे गाणे देखील संगीतबद्ध केलेले हे गाणे वैशाली माडे यांनी गायले आहे. हे गाणे खास डीजेवाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवले असल्याचे या गाण्याचे गीतकार कौतुक शिरोडकर सांगतात. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांनी केले असून लवकरच हा नवा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आजकाल लग्न समारंभ अथवा इतर कोणत्याही सण समारंभात डीजेचा वापर सर्रास होताना दिसतो. त्यामुळे त्या डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी - मराठी गाणी आतापर्यंत आली आणि हिट देखील झाली. पण हे गाणे या सर्वांत वेगळे आहे कारण याची शब्दरचना इतरांपेक्षा वेगळी आहे. 'भावा, मित्रा, दादा' सारखे आदरार्थी शब्द आणि वैशाली माडे यांच्या आवाजाच्या अस्सल मराठमोळ्या ठसक्याला दिपालीच्या दमदार परफॉर्मेन्सने जणू चार चाँद लावले आहेत. त्यामुळे थोड्या आगळ्या-वेगळ्या धाटणीचा हा म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीत नक्की उतरेल यात शंकाच नाही.