'ओम शांती ओम, 'बचना ए हसीनो', 'लव्ह आज कल', 'ये जवानी है दिवानी' अशा असंख्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण (Deepika padukone). सध्या दीपिका तिच्या आगामी 'गहराइयां' या चित्रपटामुळे चर्चेत येत आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असून यात सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिकाचे काही बोल्ड सीन शूट करण्यात आले आहेत. अलिकडेच एका मुलाखतीत दीपिकाला या बोल्ड सीनविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची दीपिकाने बेधडकपणे उत्तरं दिली आहेत.
अलिकडेच एका मुलाखतीत दीपिकाला 'गहराइयां' चित्रपटाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. यात सिद्धांतसोबतचा सीन पाहून ''कोणत्याही चित्रपटात इंटिमेट सीन देण्यापूर्वी पती रणवीर सिंग याची परवानगी घेतेस का? किंवा त्याला पूर्वकल्पना देतेस का?", असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर दीपिकाने सडेतोड उत्तर दिलं.
इंटिमेट सीनविषयी दीपिकाने दिलं 'हे' उत्तर
"मुळात या प्रश्नावर उत्तर देणं सुद्धा मुर्खपणाच आहे. आमच्यासाठी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्टी आहे. पण, मी कधीच लोकांच्या कमेंट्स वाचत नाही. आणि, मला वाटतं रणवीरसुद्धा या कमेंट वाचत नसेल. मुळात हा सगळा प्रकारच विचित्र आहे. हे फार वेडेपणासारखं आहे", असं दीपिका म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला वाटतं गहराइयांमधलं माझं काम पाहून रणवीरला नक्कीच माझा अभिमान वाटला असेल. त्याला या चित्रपटाचा अभिमान आहे कारण हा चित्रपट आम्ही केलाय. त्यामुळे त्याला नक्कीच माझा अभिमान आहे."
दरम्यान, शकुन बत्रा दिग्दर्शित गहराइयां हा चित्रपट एका मॉर्डन रिलेशनशीपवर भाष्य करणारा आहे. यात दीपिका आणि सिद्धांत व्यतिरिक्त अनन्या पांडे आणि धैर्य करवादेखील झळकले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून ही टीम प्रमोशनमध्ये व्यस्त असून अनन्या आणि दीपिका अनेकदा त्यांच्या कपड्यांमुळे चर्चेत आल्या आहेत.