गेल्या अनेक दिवसांपासून दीपिका पादुकोण दिग्दर्शक कबीर खानच्या '८३' सिनेमात दिसणार असल्याची चर्चा होती. या सिनेमात दीपिका पादुकोणरणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता दीपिकाने स्वत: '८३' चा भाग असल्याचा खुलासा केला. ती या चित्रपटात रोमी देव यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे तिने मीडियात सांगितले आहे. एवढेच नव्हे तर '८३' मध्ये कपिल देव यांची भूमिका रणवीर सिंगशिवाय दुसरा कुणी अभिनेता साकारत असता तरी देखील मी ही भूमिका केली असती असे तिने सांगितले आहे.
लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला सिनेमा आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. सध्या या सिनेमाची टीम लंडनला शूटिंग करतेय.
दीपिका '८३' या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी मीडियाशी बोलली असली तरी रणवीरने एका हटक्या अंदाजात '८३' या चित्रपटात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत कोण असणार याविषयी सांगितले आहे. रणवीरने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असून काहीच वेळात तो चांगलाच व्हायरल झाला आहे. एवढेच नव्हे तर रणवीर आणि दीपिकाचे फॅन्स या व्हिडिओवर भन्नाट कमेंट करत आहेत.
रणवीरने शेअर केलेल्या या व्हिडिओत दीपिका रणवीरला मस्करीत बॅटने मारताना दिसत आहे. या दोघांचे या व्हिडिओतील हावभाव त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत. या व्हिडिओत दोघांनी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले असून रणवीरने या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, ही माझ्या रिल आणि रिअल जीवनाची ही कथा आहे... या व्हिडिओत रणवीर मार खातोय हे पाहून ही प्रत्येक लग्न झालेल्या माणसाची कथा आहे असे त्याच्या एका फॅनने मस्करीत म्हटले आहे.
१९८३ च्या क्रिकेट वर्ल्डकपवर आधारित या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांना १० एप्रिल २०२० पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.