दीप्ती नवल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. जुनून, चश्मेबद्दूर, कथा, साथ-साथ यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्यात. पंजाबमध्ये जन्मलेल्या दीप्ती नवल यांचे बालपण अमेरिकेत गेले. त्यांचे वडील अमेरिकेतल्या सिटी विद्यापीठात शिक्षक होते. अभिनय क्षेत्रात येण्याचे निश्चित करून त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1978 मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ चित्रपटातून त्यांनी मनोरंजनविश्वात पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. त्यांच्या अभिनयाने अनेक चित्रपट सुपरडुपर हिट ठरले.
दीप्ती नवल यांची मुख्य भूमिका असलेल्या चश्मेबद्दूर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या चित्रपटात फारुख शेख यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचा काही वर्षांपूर्वी रिमेक बनवण्यात आला होता. या चित्रपटाच्या रिमेकच्या निमित्ताने काही पत्रकार दीप्ती यांच्या घरी पोहोचले होते. त्यावेळी फारुख शेखदेखील घरात होते. दीप्ती पत्रकारांशी संवाद साधत असताना सोसायटीमधील काही लोक अचानक घरात घुसले आणि मुलाखत बंद करण्यासाठी सांगू लागले. दीप्ती घरात चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत असा त्यांचा समज झाला होता. सोसायटीवाल्यांच्या वागण्याचा दीप्ती यांना चांगलाच मनस्ताप झाला होता. त्यामुळे त्यांनी काही दिवसांनी हे घर सोडले. खरे तर त्या ३० वर्षं त्या घरात राहिल्या होत्या.
दीप्ती यांनी एका मुलाखतीत याविषयी सांगितले की, त्या बिल़्डिंगमध्ये कोणीच राहायला देखील तयार नव्हते, तेव्हा मी त्या बिल्डिंगमध्ये घर घेतले होते. मला तिथे माझे अनेक पत्रकार मित्र तसेच इंडस्ट्रीतील मित्र भेटायला येत असत... पण मी सेक्स रॅकेट चालवते अशाप्रकारे सोसायटीमधील लोक माझ्याशी वागत असत... माझी केवळ एकच चुकी होती की, मी सोसायटीमधील कोणाशी बोलत नव्हते. पण ही मुलाखती व्यवस्थित न वाचता काही प्रसारमाध्यमांनी दीप्ती सेक्स रॅकेट चालवतात असा सोसायटीवाल्यांचा आरोप आहे अशा बातम्या छापल्या होत्या. याचा त्यांना खूपच मनस्ताप झाला होता.