Join us

‘गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नक्कीच काम करणार’

By admin | Published: January 29, 2017 2:47 AM

‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. अंगावर शहारे येतील, असे डायलॉग... काळजाला भिडणारी गाणी आणि तडफदार कलाकारांचा

- Priyanka Londhe

‘बघतोस काय मुजरा कर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच जोरदार चर्चा सुरू आहे. अंगावर शहारे येतील, असे डायलॉग... काळजाला भिडणारी गाणी आणि तडफदार कलाकारांचा समावेश असणाऱ्या या चित्रपटातून शिवाजी महाराजांना वंदन करण्यात आले आहे. या चित्रपटाविषयी अभिनेता जितेंद्र जोशीने लोकमत सीएनएक्सशी साधलेला हा दिलखुलास संवाद...बघतोस काय मुजरा कर या चित्रपटाकडे राजकारण म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे सिनेमाला अडचणी येऊ शकतात किंवा पुढे विरोध होऊ शकतो असे वाटतेय का?- नाही मला असे बिलकूलच वाटत नाही. सत्ताधारी पक्षातीलच अनेकांनी आम्हाला सांगितले, की गडकिल्ल्यांचे संवर्धन हे झालेच पाहिजे. या चित्रपटाच्या ट्रेलरचा परिणाम आहे किंवा नाही हे मला माहित नाही पण, औरंगाबादमधील तीन किल्ल्यांना ११ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यामुळे काही तरी सकारात्मक हे नक्कीच घडतंय, असे मला वाटते.

लंडनमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, तो अनुभव कसा होता?- लंडनमध्ये आम्ही या सिनेमाचे अगदी चार दिवसांत शूटिंग संपविले. आमचा अनुभव तर खूपच छान होता. शूटिंगच्या दरम्यान तिथे एक किस्सा घडला. आम्हाला तिथल्या एका म्युझियममध्ये चोरी झाल्याचा सीन चित्रीत करायचा होता. त्यासाठी आम्ही परवानगी घेतली. पण जेव्हा तो सीन शूट करण्याची वेळ आली, त्या वेळी पोलिसांची गाडी आम्हाला मागवायची होती. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, की इथे अशा प्रकारचा प्रसंग घडूच शकत नाही. त्यामुळे तुम्हाला असा सीन शूट करता येणार नाही.

एक स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमे याचा हा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे तुमचा एकत्र काम करण्याचा अनुभव कसा होता?- या चित्रपटाचा विषयच असा होता, की आम्ही सर्वांनी अगदी झपाटून काम केले आहे. ती स्फूर्ती आणि ऊर्जा आम्हाला हेमंतमुळेच मिळाली आहे. तुम्ही जर आमची टीम पाहिली तर पर्ण पेठे अगदी छोट्या रोलसाठीदेखील काम करायला तयार झाली, कारण या सिनेमाचा विषयच भिडणारा होता. संगीतकार अमितराज, आदर्श शिंदे, आमचा कॅमेरामन मिलिंद जोग, कॉश्च्युमसाठी कल्याणी कुलकर्णी एकत्र आले. आमच्या या टीमने अगदी जोमाने काम केले आहे. त्यामुळे हेमंतसोबत आणि या संपूर्ण टीमसोबतच काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव मला मिळाला.

आज कोणताही चित्रपट करताना पैशांचा विचार केला जातोच, याविषयी तू काय सांगशील?- पैशांचा विचार करायलाच पाहिजे. तुम्ही हे विसरूच शकत नाही, की कोणतेही काम करण्यासाठी पैसे लागतातच. आता चित्रपटाची पटकथा लिहायची असेल तर कागद, पेन तरी लागेलच ना. बोटातून काही शाई येत नाही. कागद आणण्यासाठी तरी तुमच्याकडे पैसे पाहिजेत ना. पैशाशिवाय काहीही चालणार नाही, हे पण लक्षात घ्यायला हवे. सेलिब्रिटींनी त्यांच्या स्टेटसचा वापर सामाजिक कायार्साठी करावा का, याविषयी तुला काय वाटते?- नक्कीच कलाकारांनी सामाजिक कायार्साठी पुढे यावे, असे मला वाटते. आपल्याकडे तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पाहाल तर या गोष्टीची सुरुवात फार पूर्वी झाली आहे. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले या कलाकारांनी बरेच सामाजिक काम केले आहे. पण त्या वेळी या सर्व गोष्टींना ग्लॅमर नव्हते. हे कलाकार कधी त्याविषयी बोलतही नसायचे. या चित्रपटाच्यानिमित्ताने तर मी एवढे सांगतो, की माझ्या सेलिब्रिटी स्टेटसचा उपयोग जर होत असेल तर मी यापुढे नक्कीच गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करीन. हे काम फक्त चित्रपटापुरतेच मर्यादित नव्हते, तर यानंतरदेखील यासाठी योगदान देण्याची माझी इच्छा आहे.