- Aboli Kulkarni
हिंदी चित्रपटसृष्टीत आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी अपंग व्यक्तींच्या भूमिका साकारल्या. भूमिकांचा दुबळेपणा आणि सहानुभूतिपूर्ण कथानक अशा प्रकारचे चित्र आजतागायत पडद्यावर चित्रित करण्यात आले आहे. त्यांच्या आयुष्यातील दु:खी क्षण, त्यांचा खडतर प्रवास असेच काहीसे चित्रण चित्रपटांमध्ये दाखविण्यात आले. मात्र, बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्यांमुळे अपंग व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यांनी त्यांच्या अपंगत्वावर मात करून आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा संदेशच जणू प्रेक्षकांना या चित्रपटांच्या माध्यमातून दिला. कणखर, खंबीर, बिनधास्त आणि तितक्याच ताकदीच्या भूमिका कलाकारांनी चित्रपटांमध्ये साकारल्या. पाहूया, कुठले आहेत हे चित्रपट आणि कोणत्या भूमिका...मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ हटके आणि आव्हानात्मक विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे कल्की कोचलिन. ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ या शोनाली बोस दिग्दर्शित चित्रपटात तिने ‘लैला’ या मुख्य पात्राची भूमिका साकारली आहे. सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेल्या युवतीची भूमिका तिने साकारलीय. तिला तिच्या आॅफिसमध्ये खूप सहानुभूतीची वागणूक मिळत असते. पण, तिला ते नको असते. तिच्या व्यक्तिरेखेतून ती दाखवून देते, की ‘अपंगांना स्पेशल ट्रीटमेंटची गरज नसते. त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक दिली गेली पाहिजे.’कोशिश संजीवकुमार आणि जया भादुरी या मूकबधिर दाम्पत्याचे जीवन ‘कोशिश’ या १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रित करण्यात आले आहे. हरी आणि आरती हे दोघे एकमेकांच्या आयुष्यात येतात आणि प्रेमात पडतात. त्यांच्या मुलाला ते सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण देतात. त्यांचा रोजच्या जीवनातील संघर्ष, दु:ख, झगडा या माध्यमातून जीवनप्रवास दाखविण्यात आलाय. त्यांच्या या झगड्यात त्यांनी कधीही त्यांच्या अपंगत्वाचे कारण पुढे केलेले नसते. आयुष्यात कितीही मोठे वादळ आले तरीही न डगमगता अढळ कसे राहायचे? हे यातून दाखवण्यात आले आहे. स्पर्श अंध अनिरुद्ध परमार (नसीरुद्दिन शाह) आणि डोळस कविता (शबाना आझमी) यांच्यातील प्रेमकहाणी ‘स्पर्श’ या १९८० या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटात दाखविण्यात आली आहे. अंध मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकाची भूमिका नसीरुद्दिन शाहने केली आहे. कविताला जेव्हा अनिरुद्धच्या तिच्यावरील प्रेमाबद्दल कळते तेव्हा त्या दोघांनाही प्रेमाचा स्पर्श होतो. अंधत्वावर मात करणारं हे जोडपं प्रेक्षकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सदमा श्रीदेवी आणि कमल हसन यांचा सर्वाेत्कृष्ट चित्रपट कोणता? असा विचार केला तर ‘सदमा’ या चित्रपटाचे नाव ओठी येते. बालू महेंद्र दिग्दर्शित या चित्रपटात कार अपघातात स्मृती गेलेल्या एका तरुणी नेहलताची (श्रीदेवी) कहाणी मांडली आहे. तिच्या आयुष्यात आलेला सोमू (कमल हसन) शिक्षक तिच्या प्रेमात पडतो. विस्मृतीवर मात करून ते दोघे एकमेकांसोबत एक सुखी आयुष्य जगू लागतात. लहान मुलीच्या विश्वात रमणारी नेहलता मानसिकदृष्ट्या स्वत:ला किती स्ट्राँग बनवते या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे. या चित्रपटासाठी कमल हसन याला नॅशनल अॅवॉर्ड मिळाले आहे.खामोशी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘खामोशी’ (१९९६) या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये संगीत, अभिनय या क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटवला. नाना पाटेकर, मनीषा कोईराला, सलमान खान, सीमा बिस्वास आणि हेलन यांच्या भूमिकेतील या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर उत्तम गल्ला जमवला. यात जोसेफ (नाना पाटेकर), फ्लेवी ब्रॅगांझा (सीमा विश्वास) यांनी मूकबधिर जोडप्याची भूमिका साकारली आहे. त्यांची मुलगी अॅनी (मनीषा कोईराला) ही तरी मूकबधिर म्हणून जन्माला येऊ नये म्हणून ते प्रयत्न करतात. त्यात ते यशस्वीही होतात. त्यांनी साकारलेलं हे जोडपं पडद्यावर कुठल्याही दृष्टीने कमजोर वाटत नाही. इकबाल नागेश कुकूनूर्स दिग्दर्शित ‘इकबाल’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे याने मूकबधिर युवकाची भूमिका केली आहे. शेतकऱ्याच्या मुलाचा अभिनय त्याने केला आहे. मूकबधिर असूनही तो उत्तम क्रिकेट खेळत असतो. प्रशिक्षक नसीरुद्दिन शाह याच्याकडून तो ट्रेनिंग घेतो आणि भारतीय क्रिकेट टीमचा उत्कृष्ट खेळाडू बनतो. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या मूकबधिर युवकाचा उत्तम अभिनय त्याने केला आहे.