Join us

एक दंत चिकित्सक ते 'इमली' मालिकेतील मालिनी, मराठमोळ्या मयुरी देशमुखचा अभिनेत्री बनण्याचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 7:00 AM

मराठमोळी अभिनेत्री मयुरी देशमुख सध्या इमली या हिंदी मालिकेत पहायला मिळते आहे.

मराठमोळ्या मयुरी देशमुखने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ती स्टार प्लसवरील बहुचर्चित अशा इमली मालिकेत आपल्या अभिनयाने आपल्या चाहत्यांना जिंकत असल्याचे पहायला मिळत आहे. या मालिकेतून मयुरीने हिंदी मनोरंजनाच्या दुनियेत पहिले पाऊल टाकले होते. या मालिकेत मयुरी दिल्ली विद्यापीठातील एका प्रोफेसरची भूमिका करत आहे. मयुरीच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास ती पेशाने एक दंत चिकित्सक आहे. 

मयुरीने साकारलेल्या मालिनीच्या भूमिकेला चाहत्यांनी खूप प्रेम दिले. पण प्रत्यक्षात तिला कधीही हिंदीतील आघाडीच्या मालिकेत कामच करायचे नव्हते. याबद्दल मयुरी म्हणाली, मालिनीच्या भूमिकेकरता ऑडिशन देण्याकरता निर्मात्यांनी तिला बोलावले, पण तिने गंभीरपणे यावर विचारच केला नव्हता. तिने त्यांना स्वतःहून परत फोनही केले नव्हते. पण लूक टेस्टसाठी ती मंडळीच तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत होते. मी या भूमिकेसाठी योग्य आहे आणि त्यामुळे माझ्या निवडीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. हिंदी मालिकांमध्ये पुष्कळ मेलोड्रामा असतो अशी माझी समजूत होती. याशिवाय मालिकेत काही माझी मुख्य भूमिका नव्हती. याउलट आतापर्यंत मी लीड प्रोजेक्ट्स करत आली होती. मराठी मालिकेत तर ही चांगल्या भूमिका करत होती. पण अचानक हिंदी मालिकांमध्ये ही छोट्या भूमिका का करतेय असं माझ्या मराठी चाहत्यांनी मला विचारावं असं अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे लूक टेस्टच्या दरम्यान स्क्रिप्ट मिळाल्यावर,  स्वाभाविकपणे मला योग्य वाटेल तशा पद्धतीने ही भूमिका करीन असं मी निर्मात्यांना सांगितले. माझ्या या मागणीमुळे ते नकार देतील असा मला विश्वास होता. पण ही भूमिका माझ्या नशीबातच होती, त्यांनीही माझी अट मान्य केली. 

ती पुढे म्हणाली की, निर्मात्यांची एक गोष्ट मला आवडली, जर तुला ही भूमिका पसंत नसेल तर आमच्याकडे आणखी तीन प्रोजेक्ट्स असून त्यातील तू कुठलाही प्रोजेक्ट निवडू शकते असं त्यांनी मला सांगितले. एका अभिनेत्रीसाठी असं कौतुक फार कमी पाहायला मिळते. यात अहंकार कुठेच नव्हता त्यामुळे मी ही या भूमिकेसाठी होकार दिला अन येथूनच माझ्या हिंदीतील टीव्ही करियरला सुरुवात झाली. 

एक दंत चिकित्सक ते अभिनेत्री झालेल्या मयुरीने कधी अभिनय करायचा विचारच केला नव्हता. मयुरी म्हणाली,  मी खूप अभ्यासू मुलगी होते. पण बॅचलर ऑफ डेंटिस्टच्या दुसऱ्या वर्षाला असताना खूप त्रास घेऊन, सतत अभ्यास करुनही स्वतः खुश नव्हते.

कॉलेजमध्ये असताना मी केवळ अभ्यासात व्यस्त होती. पण हो, शाळेत आणि कॉलेजात असताना मी नाटकं लिहायची आणि त्यात अभिनयही करायची.  त्यामुळे आई वडिलांना मी सांगितले, मी जे काही करतेय त्यात खुश नाही. मला एक लेखक, दिगदर्शक आणि अभिनेत्री म्हणून रंगभूमीवर करियर करायचे आहे. शिक्षण हे त्यांच्यासाठी महत्वाचं होते त्यामुळे त्यांनी प्रथम शिक्षण नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर कला आणि रंगभूमीवर नशीब अजमावण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आजतागायत मी मागे वळून पाहिलेले नाही.

टॅग्स :मयुरी देशमुखस्टार प्लस