'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. याच दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'महामुलाखत' झाली. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत सिनेमागृहात सिनेमा पाहायला जाण्यावरही त्यांनी खुलासा केला.
'तुम्ही दोघं एकत्र शेवटचा सिनेमा पाहायला केव्हा गेला होतात?' असा प्रश्न लोकमतच्या मुलाखतीत उपमुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'खरे तर माझ्या लक्षात नाही आणि मला असं वाटतं तिच्याही लक्षात नसेल. आम्ही घरी एखादा सिनेमा पाहिला असेल पण, त्याचीही शक्यता कमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही एकत्र चित्रपट पाहायला गेलेलो नाही. सिनेमा पाहायला मला वेळच मिळत नाही'.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, 'अगदी खरं सांगायचं झालं तर मी २०१४ मध्ये मुख्यमंत्री झालो. त्यानंतर आजपर्यंत मी चित्रपटगृहात फक्त दोन वेळाच गेलो आहे. एकदा टिळक सिनेमाचा प्रीमियर शो होता. म्हणून गेलो होतो आणि दुसऱ्यांदा केरला स्टोरी सिनेमाच्या प्रिमियरला गेलो होते. तेव्हा चित्रपटगृहात जाण्याची माझी दुसरी वेळ होती. या व्यतिरिक्त माझं जाणं झालं नाही'.
'आम्ही तिघं म्हणजे जेव्हा एकत्र असतो तेव्हा, आयपॅडवर आम्ही तिघं तीन वेगवेगळे सिनेमे पाहत असतो. मला दिवीजा आणि अमृताबरोबर एकत्र चित्रपट पाहायला फार आवडेल. पण, हे शक्य किती होईल याबद्दल मला काही माहिती नाही' असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या बँकर आहेत. पण, त्या गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील अनेक गाणी गायली आहेत.