'जय मल्हार' मालिकेतील 'खंडोबा' भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे (Devdutt Nage) सध्या 'जीव माझा गुंतला' या मालिकेत काम करत आहे. देवदत्त अतिशय गुणी अभिनेता असून त्याने अजय देवगणच्या तान्हाजी (Tanhaji) चित्रपटातही भूमिका केली आहे. इतकंच काय तर दिग्दर्शक ओम राऊत यांच्या आगामी बिगबजेट 'आदिपुरुष'मध्येही (Adipurush) तो हनुमानाची भूमिका साकारत आहे. बॉलिवुडमध्ये इतका छान ब्रेक मिळूनही देवदत्त पुन्हा मालिकेकडे का वळला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्यांचंच उत्तर देवदत्तने एका मुलाखतीत दिले आहे.
देवदत्त म्हणतो, 'मालिकेत जे माझं पात्र आहे ते करायला मिळणं हे माझ्यासाठी सुवर्णसंधीच होती. कारण मी जे पात्र साकारतोय ते नक्की चांगलं आहे की वाईट हेच अजून प्रेक्षकांना कळलेलं नाही. त्यांची गफलत होत आहे. हीच माझ्या पात्राची खरी मजा आहे. असं पात्र साकारणं माझ्यासाठी एक आव्हानच होतं. मी आयुष्यात कोणत्याच गोष्टीसाठी सीमा आखलेली नाही. नवीन गोष्टी करण्यापासून मी स्वत:ला अडवत नाही.तसंही मला छोट्या पडद्यानेच तर ओळख दिली आहे. जय मल्हार या मालिकेमुळए मी घराघरात पोहोचलोय. आजही लोकं मला खंडोबा भूमिकेसाठी ओळखतात.'
तो पुढे सांगतो,'मी कायम टेलिव्हिजनचा ऋणी राहीन.छोट्या पडद्यावर काम करणं मी कधीच विसरणार नाही. बॉलिवड असो किंवा इतर प्रोजेक्ट मी नेहमीच टेलिव्हिजनचा आदर करेन. मी जो आहे तो फक्त टेलिव्हिजनमुळे आहे.'
देवदत्तला नेहमी आपण वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिले आहे. त्यात तान्हाजी मध्ये त्याने केलेल्या कामाचे बरेच कौतुक झाले. आता आदिपुरुष चित्रपटात त्याच्यावर महत्वाच्या भूमिकेची जबाबदारी दिली आहे. देवदत्तला आदिपुरुष सिनेमात बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.