महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर महायुतीने (Mahayuti) अखेरीस सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आज (०५ डिसेंबर २०२४ ) मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांनी खास पोस्ट केली आहे.
सलील कुलकर्णी यांनी देवेंद्र फडणवीसांबरोबरचा १० वर्षांपूर्वीचा एका कार्यक्रमातील फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं अभिनंदन केलं आहे.
सलील कुलकर्णींची पोस्ट
माननीय देवेंद्रपंत..मनःपूर्वक अभिनंदन...
दहा वर्षांपूर्वी...म्हणजे २०१४ मध्ये परममित्र मुरलीअण्णांनी आयोजित केलेल्या कोथरूड महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेली ही देवेंद्रजी फडणवीस ह्यांची पहिली निवांत भेट...त्याचा हा फोटो !!गुरू जयमालाबाई आणि कीर्ती शिलेदार ह्यांच्या उपस्थितीत मिळालेला हा पुरस्कार...
ही भेट देवेंद्रजीनाही अजून लक्षात आहे ही या माणसाची कमाल आहे...या माणसाकडे काहीतरी वेगळीच शांतता आहे...समाज माध्यमांवर झालेली टीका..कुटुंबीयांची झालेली चेष्टा....या माणसाने ज्या पद्धतीने हाताळली...ही गोष्ट स्पृहणीय आहे.
या फोटोत एकीकडे तेव्हाचे नगरसेवक आणि आत्ताचे केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीअण्णा मोहोळ आहेत आणि एकीकडे तेव्हाचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत...
दोघांनीही निष्ठा आणि कष्ट यातून मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे...आणि त्यांच्याशी आपण सहज बोलू शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो अशी ही दोन माणसं...!!
एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे...“मी पुन्हा येणार” म्हणणारा माणूस...पुन्हा आला..तो सुद्धा दिमाखात....!!सगळ्या साथीदारांना बरोबर घेऊन...!!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र जी फडणवीस ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !!
माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादा ह्यांचेही मनापासून अभिनंदन !!
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्यासह आज अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मंत्री, अनेक दिग्गज मंडळी, संत-महंत, लाडक्या बहिणी, शेतकरी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.