एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण, त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या व्यक्तिची कथा आपण ‘देवमाणूस’ (Devmanus Serial) या मालिकेत पाहिली. या मालिकेचा पहिला सीझन तुफान गाजला. यानंतर मालिकेचा दुसरा सीझनही आला. मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा घराघरात पोहोचल्या. आजही या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेत अजितकुमार देव ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याची भूमिका कुणीच विसरू शकत नाही. आणखी एक अशीच गाजलेली व्यक्तिरेखा म्हणजे विजय शिंदेची. परभणीचा अभिनेता एकनाथ गीते (Eknath Geete) याने ही व्यक्तिरेखा साकारली होती. ‘देवमाणूस’ फेम याच एकनाथ गीतेची एक पोस्ट सध्या व्हायरल होतेय. नुकताच एकनाथचा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांचे त्याने खास आभार मानले आहेत. त्याने लिहिलेली पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.
पोस्टमध्ये तो लिहितो, “काल सकाळी मी उठून माझा फोन बघितला तर ७८ miss calls होते. मी सर्वांना call back नाही करू शकलो Sorry.१४० च्या आसपास insta stories add केल्या, नंतर काही stories add होत नव्हत्या, fail झाल्या त्यासाठी सॉरी, काही Facebook posts miss झाल्या असतील माझ्याकडून, बऱ्याच जणांना WhatsApp, Messenger आणि Text वर रिप्लाय करू शकलो नाही, त्यासाठी सुद्धा Sorry. मी खरंच माफी मागतो सर्वांची……..पण तुम्ही सर्वानी जे भरभरून, इतकं सारं प्रेम दिलं आणि माझा वाढदिवस “स्पेशल” बनवलात त्याबद्दल मी ऋणी राहिन सर्वांचा….. तुमचं असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम माझ्यासोबत असु द्या… थँक यू आणि लव्ह यू”, असं एकनाथ गीतेने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे एकनाथ मूळ गाव. शालेय जीवनापासूनच एकनाथला अभिनयाची आवड होती. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात तो नेहमी आवर्जून सहभागी व्हायचा. त्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर ऑफ थिएटर्स आर्ट्स केलं. हळूहळू छोटी मोठी मिळतील ती कामे नाटकात करत गेला. पण एकनाथला खरी प्रसिद्धी मिळाली ती देवमाणूस या मालिकेमुळे. या मालिकेआधी त्याने ‘तू अशी जवळी रहा’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘जागते रहो महाराष्ट्र’, ‘श्री गुरुदेव दत्त’, ‘देव पावला’, ‘घेतला वसा टाकू नको’ अशा मालिकेतही काम केलं आहे. तांडव सारख्या मराठी चित्रपटातून देखील तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. “घेतला वसा टाकू नको” या मालिकेत देखील सूर्यदेवाच्या रूपात तो चमकला. सोनी मराठीवरील “गाथा नवनाथांची” या मालिकेत राजा गोपीचंद त्याने साकारला होता.