Join us

"मराठी चित्रपटांविषयी काहीतरी घाणेरडं...", अभिनेता सुबोध भावेने व्यक्त केली खंत, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 16:54 IST

लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.

Subodh Bhave: लव फिल्म्स प्रस्तुत, तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महेश मांडजरेकर आणि रेणूका शहाणे यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचबरोबरच अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सिद्धार्थ बोडके हे कलाकार देखील सिनेमात पाहायला मिळणार आहेत. 'देवमााणूस' या चित्रपटात सुबोध इंस्पेक्टर रवी हे पात्र साकारणार आहे. याचनिमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने सध्याच्या मराठी चित्रपटांच्या स्थितीबद्दल भाष्य केलं आहे.

नुकताच सुबोध भावेने इट्स मज्जासोबत संवाद साधला. त्यादरम्यान बोलताना अभिनेता म्हणाला, "मला असं वाटतं की कुठल्याही गोष्टीवर टिका करणं खूप सोपं आहे. त्यासाठी काहीच लागत नाही. पण, आपण टिका करतोय त्यामागे काही लॉजिकल कारण आहे का? तर तुम्हाला चित्रपट बघायचा नाही आणि मराठी चित्रपटांविषयी काहीतरी घाणेरडं असणार असा न्यूनगंड तयार केला  गेला आहे. असंच जर तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पाहिलं तर तुम्हाला काहीच आवडणार नाही."

पुढे सुबोध भावे म्हणाला, "पण आता असलेल्या बजेटमध्येसुद्धा किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न मराठी दिग्दर्शक, निर्माते करत आहेत. आता लवकरच काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. पण त्या प्रत्येक चित्रपटाची गोष्ट फार वेगळं आहे. शिवाय प्रत्येकाला आपली आर्थिक मर्यादा माहिती असून त्याने लोकांपर्यंत काहीतरी वेगळं नेण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही जर का मनात हेच ठरवलं असेल की, साउथचे आणि हिंदी चित्रपट ग्रेट आणि मराठी चित्रपट वाईट असतात, तर तुम्हाला कोणीच काही सांगणार नाही." अशी खंत अभिनेत्याने व्यक्त केली.  

टॅग्स :सुबोध भावे मराठी अभिनेतासेलिब्रिटीसिनेमा