‘धकधक गर्ल’ म्हणा किंवा नुसत्या स्मितहास्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सौंदर्यवती म्हणा. कितीही विशेषणं वापरली तरीही अनेकांच्याच डोळ्यांसमोर निर्विवादपणे एकच चेहरा उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने. माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची जोडी 90 च्या दशकातील हिट जोडी ठरली. या दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 'तेजाब', 'बेटा', 'राम लखन', 'किशन कन्हैया', 'पुकार', 'हिफाजत', 'परिंदा', 'जमाई राजा', 'प्रतिकार' सोबतच अनेक चित्रपटांमध्ये या जोडीने रसिकांचे भरघोस मनोरंजन केले.
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा चित्रपट बेटा 1992 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे हा चित्रपट हिट ठरला. अनिल आणि माधुरीच्या जोडीलाही प्रचंड पसंती मिळाली याच चित्रपटातल्या 'धक धक करने लगा' हे गाणे इतके गाजले की, त्यामुळे माधुरीला एक वेगळी ओळख मिळाली ती म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षित.
या गाण्यानं माधुरीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं.सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं शूट करण्यात आलं होतं. माधुरीला ‘बेटा’ चित्रपटासाठी त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.या चित्रपटानंतर तिला अनेक ऑफर्स मिळायला लागल्या. माधुरी प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंती बनली. त्यावेळच्या आघाडीच्या अभिनेत्रींनाही माधुरीने मागे टाकले होते.
पण तुम्हाला माहिती आहे का? 'बेटा' या चित्रपटासाठी माधुरी दिग्दर्शकाची पहिली पसंती नव्हतीच. माधुरी आधी दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांना ऑफर देण्यात आली होती. मात्र श्रीदेवी यांनी ही ऑफर स्विकारली नाही. सतत चित्रपटाच्या तारखा पुढे ढकलत होत्या आणि दुसरे कारण होते अनिल कपूरसोबत त्यांनी याआधीही अनेक चित्रपटात काम केले होते. त्यामुळे पुन्हा अनिल कपूरसोबतच काम करण्याची त्यांची इच्छा नव्हती.
श्रीदेवीला दुसऱ्या कलाकारांसोबत काम करायचं होतं. म्हणून श्रीदेवी यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिल्याचे बोलले जाते. श्रीदेवींने नकार दिल्यानंतर माधुरीला ही ऑफर देण्यात आली आणि माधुरीने मिळालेल्या संधीचं सोनं करत तमाम रसिकांची धकधक गर्ल बनली.
'धक धक करने लगा' हे गाणे तेलुगू चित्रपटातून घेण्यात आले होते.इंद्रकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. सुरुवातील चित्रपटाचे 'बडी बहू' असे ठेवण्यात आले होते. नंतर काही कारणामुळे नावात बदल करुन 'बेटा' करण्यात आले होते.