आज बहिणी भावाच्या प्रेमाचा सण अर्थात रक्षाबंधन. आज देशभर मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरं होत आहे. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. वहिनीसाहेब म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) हिचा उत्साह सुद्धा शिगेला पोहोचला आहे. रक्षाबंधन या सणाच्या एक ना अनेक आठवणी धनश्रीकडे आहेत. यापैकी काही आठवणी तिने शेअर केल्या आहेत. विशेषत: लहानपणी ती आणि तिचा भाऊ सौरभ रक्षाबंधन हा सण कसा साजरा करायचे हे तिने सांगितलं आहे.
एका मुलाखतीत रक्षाबंधनाची आठवण सांगताना ती म्हणाली, ‘ लहानपणी मी आणि माझा भाऊ सौरभ आम्ही दोघं खूप भांडायचो. भन्नाट मस्ती करायचो पण ते तेवढ्यापुरतंच. लहानपणी रक्षाबंधनाला भावाकडे मला देण्यासाठी छानशी भेटवस्तू असायची, पण मला मुद्दाम चिडवण्यासाठी तो एक रुपया द्यायचा. अशा मधुर आठवणी आहेत,’ असं ती म्हणाली.
दरवर्षी धनश्री रक्षाबंधन साजरं करते. यावेळी तर तिचा चिमुकला मुलगा कबीर सुद्धा रक्षाबंधनाच्या आनंदात सामील होणार आहे. तो सुद्धा रक्षाबंधन साजरं करणार आहे. खास म्हणजे लवकरच धनश्रीची नवी मालिका सुरू होत आहे. ‘तू चाल पुढं’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत ती शिल्पीची भूमिका साकारताना दिसणार आहे. मालिकेचं शूटींग सुरू झालं आहे. ये्त्या 15 ऑगस्टपासून झी मराठीवर ही मालिका सुरू होतेय.
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत नंदिनी वहिनी साहेबांची भूमिका साकारून धनश्री काडगावकरने तुफान लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील वहिनी साहेबांचा गावरान ठसका म्हणजे लाजवाब. त्यामुळेच मालिका संपूर्ण बरेच दिवस झाले असले तरी वहिनी साहेबांना लोक विसरू शकलेले नाही.