काही वर्षांपूर्वी ''वाय दिस कोलावरी कोलावरी डी'' असा प्रश्न विचारत त्यानं संगीत रसिकांना अक्षरशा वेड लावलं. त्याच्या सूरांवर लहानथोर आपसुकच थिरकू लागले आणि ''वाय दिस कोलावरी कोलावरी डी''' असं विचारु लागले. प्रत्येकावरच जणू काही या कोलावरी डी गाण्याने मोहिनी घातली होती. ही मोहिनी घालणारा गायक होता धनुष. दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई अशी ओळख असणा-या धनुषने कोलावरी डी म्हणत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. दक्षिणेत धनुष तसा परिचित होताच मात्र कोलावरी डी या गाण्यामुळे जगभरातील रसिकांना त्याची वेगळी गायक म्हणूनही ओळख झाली. आता पुन्हा एकदा धनुषची अशीच जादू पाहायला मिळत आहे. कारण धनुषने 'कोलावेरी डी' नंतर आणखी एका गाण्यावरून इंटरनेटवर धूम केली आहे.
धनुष आणि अभिनेत्री साई पल्लवीवर चित्रीत करण्यात आलेले 'राउडी बेबी' हे गाणं युट्यूबवर सर्वाधिक पाहिलेले पहिले दाक्षिणात्य गाणं ठरले आहे. अवघ्या 42 दिवसांत हे गाणे 20 कोटी लोकांनी पाहिले आहे. हे गाणे दिग्दर्शक बालाजी मोहन यांच्या 'मारी 2' या चित्रपटातले आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 ला प्रदर्शित झाला होता. मात्र हे गाणं युट्यूबवर अपलोड करण्यात आले नव्हते. 2 जानेवारी 2019 हे रोजी हे गाणे अपलोड करण्यात आले असून आतापर्यंत सर्वाधिक पाहिले गेलेल्या यादीत हे गाणे गणले जात आहे.